Join us

परदेशातून येणाऱ्या वैद्यकीय साहित्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:06 AM

परदेशातून येणाऱ्या वैद्यकीय साहित्याला तत्काळ मंजुरीसाठी नोडल अधिकारी नियुक्तलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हवाई आणि जलमार्गे आयात केल्या ...

परदेशातून येणाऱ्या वैद्यकीय साहित्याला तत्काळ मंजुरीसाठी नोडल अधिकारी नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हवाई आणि जलमार्गे आयात केल्या जाणाऱ्या कोविड संबंधित वैद्यकीय साहित्याला जलद मंजुरी देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.

देशभरात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागल्याने परदेशातून मदतीचा ओघ वाढला आहे. शिवाय रेमडेसिविर, टोसिलिझुमॅब यांसारख्या अत्यावश्यक औषधांची आयातही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोविडसंबंधी सर्व साहित्यासह वैद्यकीय सामग्रीला तत्काळ जकात मंजुरी मिळून जलद वाहतूक व्हावी, या उद्देशाने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त दर्जाचे अधिकारी ही जबाबदारी पार पाडतील. न्यू कस्टम हाऊस (झोन १)मध्ये अयाझ अहमद कोहली, जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस (झोन २) दीपीन सिंघला आणि मुंबई एअर कार्गो (झोन ३)मध्ये विशाल सानप यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. देशभरात अशाप्रकारे पथके कार्यरत असतील, अशी माहिती सीमा शुल्क विभागाकडून देण्यात आली.

या नोडल अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील पथके २४ तास कार्यरत असतील. केवळ कोविडसंबंधित साहित्य आणि वैद्यकीय मदत हाताळण्याचे काम त्यांच्यामार्फत केले जाईल. या अत्यावश्यक साहित्याला १५ मिनिटांच्या आत मंजुरी देण्यासाठी जलद हालचाली करण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत.

* मदतीचा ओघ सुरूच

१) न्हावाशेवा बंदरात शनिवारी १९.३० टन द्रवरूप प्राणवायू दाखल झाला. कतार येथील फ्रेंच दूतावासाने पाठविलेल्या या वैद्यकीय मदतीला तत्काळ मंजुरी देत ती इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या ताब्यात देण्यात आली.

२) अमेरिकेहून रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा शनिवारी मुंबई विमानतळावर पोहोचला. गिलिएड सायन्सकडून आयात केलेली ही औषधे इके- ५०० या विमानाच्या मदतीने आणण्यात आली. १५ मिनिटांच्या आत त्यांना मंजुरी दिल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली.

..................................................................