वैद्यकीय कचऱ्याने आरोग्याची लागली वाट; विघटनाचे मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 07:10 AM2022-03-07T07:10:13+5:302022-03-07T07:10:17+5:30

मुंबई पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, देवनार येथे एक एकरपेक्षा कमी जागेत या कचऱ्याचे विघटन करण्यात येते. या कचऱ्याची घनता पाहता ही जागा अपुरी असून अधिक जागेची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Medical waste awaits health; The big challenge of disintegration | वैद्यकीय कचऱ्याने आरोग्याची लागली वाट; विघटनाचे मोठे आव्हान

वैद्यकीय कचऱ्याने आरोग्याची लागली वाट; विघटनाचे मोठे आव्हान

googlenewsNext

स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वापरलेले मास्क, पीपीई किट, हातमोजे, हॉस्पिटलमधून येणारा सर्जिकल कचरा, असा सगळा सुमारे १५ मेट्रिक टनापेक्षा जास्त कचरा एकट्या मुंबईत दिवसाला जमा होतो. म्हणजेच, केवळ मुंबईमध्ये १५ हजार किलोपेक्षा अधिक जैव वैद्यकीय कचऱ्याची रोज निर्मिती होते. त्यामुळे या कचऱ्याच्या विघटनाचे मोठे आव्हान आहे. या कचऱ्याची नीट विल्हेवाट   लावली जात नसल्याने त्याचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसतो आहे.

मुंबई पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, देवनार येथे एक एकरपेक्षा कमी जागेत या कचऱ्याचे विघटन करण्यात येते. या कचऱ्याची घनता पाहता ही जागा अपुरी असून अधिक जागेची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील अन्य कचऱ्याच्या तुलनेत आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे आव्हान असते. जैव वैद्यकीय कचऱ्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. जनावरे, कोंबड्यांसारख्या पक्ष्यांच्या पोटात हा कचरा गेल्यास ही जनावरे, पक्ष्यांचे मांस व जनावरांच्या दुधातूनही मानवी आरोग्याला धोका होण्याची भीती असते.

मुंबई शहर आणि उपनगरात सरकारी, खासगी रुग्णालये, पालिका रुग्णालये, खासगी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय रुग्णालये-दवाखाने, खासगी दवाखाने अशा विविध स्वरूपातील १३ क्षेत्रांकडून हा जैव वैद्यकीय कचरा जमा केला जातो. कोरोनाच्या काळात या कचऱ्याचे प्रमाण वाढले होते. कारण संसर्गाच्या तीव्र काळात पीपीई किट्स, शस्त्रक्रियांचे साहित्य, मास्क यांचा वापर वाढला होता.

...तर आरोग्याला गंभीर धोका
वैद्यकीय उपचारातून निर्माण होणारा कचरा हा मानवी आणि जनावरांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतो. यातून विविध संसर्गजन्य रोगांची लागण होऊ शकते. क्षयरोग, त्वचाविकार होऊ शकतो. त्याचप्रमाणे, श्वसनसंस्थेसंदर्भातील अनेक आजार उद्भवू शकतात. लहान मुलांच्या हातात आल्यास त्यांना अपाय होऊ शकतो. या कचऱ्यामुळे रुग्णालयातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनाही संसर्ग होऊ शकतो. हा कचरा रोजच्या रोज स्वतंत्रपणे विलग न केल्यास किंवा त्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्याने त्याचे जंतू हवेत पसरू शकतात. त्यामुळे या कचऱ्याचे विभाजन व विल्हेवाट ही मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, इंडियन मेडिकल असोसिएशन, माजी अध्यक्ष.

जैव वैद्यकीय कचरा म्हणजे काय? 

क्लिनिक, रुग्णालयात उपचारास जाणाऱ्या रुग्णांच्या जखमांची ‘मलमपट्टी’ म्हणजेच ‘ड्रेसिंग’साठी वापरलेले कापूस, मलम, रक्ताने माखलेला कापूस, वापरात आलेल्या सुया, तसेच शस्त्रक्रियेतून बाहेर काढलेले शरीराचे भाग, मुदत संपलेली औषधे.

Web Title: Medical waste awaits health; The big challenge of disintegration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.