Join us

प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार औषधे; आपत्कालीन स्थितीत होणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 7:22 AM

ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार दिलासा

मुंबई : केंद्र सरकारने निवडक औषधांचा समावेश ‘ओव्हर द काऊंटर’ यादीमध्ये केल्याने ही औषधे आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार आहेत. औषधांच्या दुकानातील वैद्यकीय प्रतिनिधी म्हणजेच मेडिकल रिप्रेंझेंटेटिव्हकडून अधिकृतरीत्या या औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. 

औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या उपकलम (१) आणि कलम १२ नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून नागरिकांच्या हरकती आणि सूचनाही ऐकून घेण्यात येणार आहेत. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणाऱ्या औषधांमध्ये पॅरासिटामॉल, अँटी इन्फेक्शन आणि अँटी फंगल औषधांचा समावेश आहे. याशिवाय अँटीसेप्टिक, माऊथवॉश, काही मलम इत्यादींचाही समावेश आहे; मात्र या औषधांचे डोस पाच दिवसांपेक्षा अधिक मिळणार नाहीत.

शिवाय यादरम्यान रुग्णाला आराम नाही मिळाला, तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दिलासा मिळेल. शिवाय, बऱ्याचदा आपत्कालीन स्थितीत किंवा अन्य प्रसंगात प्रिस्क्रिप्शनसाठी ताटकळत राहावे लागते, हे सुद्धा टळण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली आहे.

‘ही’ औषधे मिळणार पोविडोन आयोडिन, क्लोरहेक्सिडिन माऊथवॉश, क्लोट्रिमेजोल क्रीम, क्लोट्रिमेजोल डस्टिंग पावडर, डेक्स्ट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाईड लोजेंजेस, डायक्लोफेनाक ऑइंटमेंट क्रीम जेल, डायफेनहाइड्रामाईन कॅप्सूल, पॅरासिटामॉल गोळ्या, सोडियम क्लोराईड नेझल स्प्रे, नेजल डिकंजस्टेन्ट, केटोकोनाझोल शाम्पू, लॅक्टुलोज सोल्युशन, बेंजोईल पॅरॉक्साईड, कॅलामाईन लोशन, जायलोमेटाजोलिन हायड्रोक्लोराईड आणि बिसाकोडाईल गोळ्या.

टॅग्स :वैद्यकीयऔषधं