Join us

उद्धव ठाकरेंनी CM असताना शब्द दिला पण पूर्ण नाही केला; मीना कांबळी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 11:07 AM

माझे कौटुंबिक संबंध ठाकरे कुटुंबासोबत होते, कुठलेही काम असले तरी रश्मी वहिनी मला फोन करायच्या. मग माझ्या बाबतीत हा अन्याय का झाला? असा प्रश्न मीना कांबळींनी उपस्थित केला.

मुंबई – ठाकरे कुटुंबाच्या निकटवर्तीय असलेल्या महिला आघाडीच्या पदाधिकारी मीना कांबळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. मीना कांबळी या फार जुन्या शिवसैनिक असून बाळासाहेब आणि माँसाहेबांसोबत त्यांनी काम केले आहे. शिवसेनेत प्रवेश करताना मीना कांबळी यांनी उद्धव ठाकरेंबाबतचा एक किस्सा आणि रश्मी ठाकरेंसोबतची आठवण सांगताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

मीना कांबळी म्हणाल्या की, माझा भाचा आशिष साखरकर, हा भारत श्री, मिस्टर युनिवर्स, शिवछत्रपती पुरस्कार विजेता, पदवीधर होता. खेळाडू म्हणून त्याला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची सरकारी योजना होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, माझा भाचा घरी आला, साहेब मुख्यमंत्री झाले तर आपलं काम होईल असं त्याने म्हटलं. मीदेखील त्याला आनंदाने होकार दिला. काही दिवसांनी मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. त्यांना सांगितले. ते म्हणाले हो, आपण काम करूया. त्यानंतर मी सातत्याने त्यांना आठवण करून द्यायची, नेत्यांना सांगून पाठपुरावा करायचे. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी यांच्याशी संपर्कात होते. तरीही काम झाले नाही. पण मी नाराज झाले नाही. पण माझा भाचा या जगातून निघून गेला. हे दु:ख मला सहन झाले नाही. भाच्याच्या निधनानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंनी फोन करून सात्वन केले. पण तेव्हा वेळ निघून गेली होती. आमचे दु:ख आयुष्याचे आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मीपण माणूस आहे, मन दुखावले जाते, तसे आज झाले. २०१२ मध्ये मला मातोश्रीहून विधान परिषदेचा फॉर्म भरायचा आहे म्हणून सांगितला. मी विधान परिषद मागितली नव्हती, उद्धव ठाकरेंनी माझे काम बघून स्वत: विचारणा केली. त्यावेळी पांडुरंग सकपाळ विभागप्रमुख होते, अनिल परबही आले होते, रात्री २ वाजेपर्यंत बसून सर्व कागदपत्रे तयार केली. सकाळी विधानभवनात पोहचली. ४ तास बसले, त्यानंतर सुभाष देसाई यांनी विचारले, फॉर्म तयार केला का, आपल्याला मातोश्रीवरून फोन आल्यावर फॉर्म भरायचा आहे असं म्हटलं. त्यानंतर ३ वाजता मुदत संपणार होती. अडीच वाजता मला सुभाष देसाईंनी काही अडचणींमुळे फॉर्म भरता येत नाही असं कळवलं. त्यानंतर काही दिवस नाराज होते. पण शिवसैनिक असल्याने पुन्हा जोमाने कामाला लागली. मात्र त्यानंतरच्या काळात अनेकजण बाहेरून आले, त्यांना तुम्ही विधान परिषद, राज्यसभा दिली. तेव्हा माझा विचार आला नाही. माझे कौटुंबिक संबंध ठाकरे कुटुंबासोबत होते, कुठलेही काम असले तरी रश्मी वहिनी मला फोन करायच्या. मग माझ्या बाबतीत हा अन्याय का झाला? अलीकडेच कार्यकारणीचा विस्तार केला, त्यात बाहेरून आलेल्या लोकांना पदे दिली, तेव्हा तुम्हाला मीना कांबळी दिसली नाही का? असा सवाल त्यांनी विचारला.

दरम्यान, मी ४४ वर्ष बाळासाहेबांची शिवसैनिक म्हणून काम करत आलीय. मी उमरखाडीत राहते, गटप्रमुख, त्यानंतर १९८५ साली महिला शाखाप्रमुख हे पद मला बाळासाहेबांनी दिले. १९९२ साली महिला विभागप्रमुख नेमण्याची वेळ आली तेव्हा मीना कांबळीला करा अशा शिफारशी शिवसैनिकांनी केल्या. दक्षिण मुंबईत २७ महिला शाखाप्रमुखांची निवड मी केली होती. सगळ्यात पहिली महिला विभाग प्रमुख म्हणून माझे नाव बाळासाहेबांनी घोषित केले. मी निष्ठेने काम केले, कधीच काही मागितले नाही. आंदोलन, निवडणुका, वैद्यकीय शिबिरे, विविध कार्यक्रम कित्येक वर्ष करतेय. बाळासाहेब आणि माँसाहेबांनी खूप प्रेम केले. रश्मी वहिनींसोबत मी कित्येक काम करतेय, रश्मी वहिनींचे लग्नही झाले नव्हते त्याआधीपासून मी पक्षात आहे. त्यांचे आणि माझे घनिष्ट संबंध होते, त्यांच्यासोबत खूप चांगले रिलेशन होते. कुठेही जायचे असेल तर रश्मी वहिनी मला फोन करायच्या. माझ्या मनात ते दु:ख, यातना आहेत असंही मीना कांबळी म्हणाल्या.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे