मुंबई नंतरचे मध्यवर्ती केंद्र म्हणून मीरा भाईंदर विकसित करणार - देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 04:07 PM2023-04-23T16:07:14+5:302023-04-23T16:07:41+5:30

आमदार गीता जैन यांची मागणी व पाठपुरावा मुळे भाईंदर येथे उभारल्या जाणाऱ्या महावीर भवन तसेच मीरारोडच्या साईबाबा नगर भागात कर्करोग उपचार रुग्णालय इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन फडणवीस यांच्या  हस्ते करण्यात आले.

Meera Bhayander to be developed as central hub after Mumbai - Devendra Fadnavis | मुंबई नंतरचे मध्यवर्ती केंद्र म्हणून मीरा भाईंदर विकसित करणार - देवेंद्र फडणवीस 

मुंबई नंतरचे मध्यवर्ती केंद्र म्हणून मीरा भाईंदर विकसित करणार - देवेंद्र फडणवीस 

googlenewsNext

मीरारोड - मुंबई नंतर एक मध्यवर्ती केंद्र म्हणून मीरा भाईंदरला तयार करत आहोत. आयुक्तालय, तहसील आदी वेगवेगळ्या योजना आणण्याचे कारण म्हणजे  शहराचे लोकेशन हे स्ट्रॅटेजिक आहे. त्यामुळे हे एक केंद्र म्हणून विकसित करू जेणे करून वसई व विरार व त्या पुढील भागाच्या विकासाला योग्य चालना मिळेल . त्याला नियोजनबद्ध स्वरूप देऊ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरारोड येथे केले . 

आमदार गीता जैन यांची मागणी व पाठपुरावा मुळे भाईंदर येथे उभारल्या जाणाऱ्या महावीर भवन तसेच मीरारोडच्या साईबाबा नगर भागात कर्करोग उपचार रुग्णालय इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन फडणवीस यांच्या  हस्ते करण्यात आले. या शिवाय भाईंदर उड्डाणपूल खाली पशु - पक्षी उपचार केंद्र व सीसीटीव्हीच्या नियंत्रण कक्षाचे  प्रत्यक्ष उदघाटन तर  काशीमीरा उड्डाणपूल खालील संत रोहिदास महाराज उद्यान चे आणि मीरा गाव येथील उर्दू शाळा इमारतीचे ऑनलाईन लोकार्पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवार २२ एप्रिल रोजी करण्यात आले. 

महापालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आयुक्त दिलीप ढोले , आमदार गीता जैन व राजहंस सिंह , माजी खासदार डॉ . विनय सहस्त्रबुद्धे , माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे , निर्मला सावळे व डिम्पल मेहता , माजी आमदार नरेंद्र मेहता , भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड . रवी व्यास , शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजू भोईर व उत्तर प्रदेश संघटक विक्रम प्रतापसिंह  , माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे व अनिकेत मनोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड , कल्पिता पिंपळे , शहर अभियंता दीपक खांबित आदींसह माजी नगरसेवक , कार्यकर्ते उपस्थित होते . 

मीरारोडच्या लता मंगेशकर नाट्यगृह मध्ये झालेल्या कार्यक्रमात आयुक्त ढोले यांनी शहरातील विविध विकासकामांची व त्यासाठी शासना कडून मिळालेला निधी , मंजुरी आदींची माहिती दिली . आ . गीता जैन यांनी भाषणात शहरवासीयांना टोलच्या त्रासातून मुक्त करण्याची मागणी केली . २०१९ ला निवडून आली तेव्हा शहरातील लहान - मोठी अनेक कामे प्रलंबित होती असे सांगूंन शासनाने सुमारे अडीज हजार कोटींचा निधी विविध माध्यमातून शहराच्या विकासाठी दिला आहे . एमआयडीसी कडून आणखी २० दशलक्ष लिटर पाणी मिळावे , शासनाचे भीमसेन जोशी रुग्णालय सुसज्जतेने चालवावे , परिवहन साठी आणखी बस द्याव्या आदी मागण्या आ . जैन यांनी मांडल्या . युएलसी मुळे गृहनिर्माण संस्थांच्या नावे सातबारा नोंदी जमीन मालकी होत नसल्याचा गंभीर प्रश्न सुटल्याने इमारतींच्या पुनर्विकासाची प्रकरणे मार्गी लागतील असे त्या म्हणाल्या . 

शासन मीरा भाईंदरच्या पाठी भक्कम उभे राहील. याच वर्षी नवीन पोलीस आयुक्तालय इमारतीचे काम सुरु होईल . पोलीस व अधिकारी वसाहत इमारत, आयुक्त निवासची कामे सुरु करणार आहोत . सूर्या पाणी योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के काम बाकी आहे . सूर्याचे पाणी मिळायला सुरवात होताच नागरिकांना २४ तास पाणी मिळेल . येत्या १ ते दिड वर्षात पाणी समस्या सुटेल .  एमआयडीसी कडून पाणी वाढते का प्रयत्न करू असे फडणवीस म्हणाले . 

मेट्रोचे काम ठरलेल्या वेळे पेक्षा दिड वर्ष पुढे गेले आहे . त्यामुळे कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत .  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मेट्रो उत्तन पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे . एमएमआर क्षेत्रात ३३७ किमी मेट्रोचे नेटवर्क मंजूर केले आहे - वसई विरार  , कल्याण डोंबिवली, भिवंडी आदी एमएमआर क्षेत्रात मेट्रोचे जाळे निर्माण होणार असून एका भागातून दुसऱ्या भागात एका तासात मेट्रोने जात येणार आहे .  

मध्यंतरीच्या काळात काम ठप्प झाले होते. विकासाच्या गाडीला मध्यंतरी लाल झेंडा दाखवला होता . आता ८  - ९ महिना आधी हिरवा झेंडा घेऊन एकनाथ शिंदे व मी आलो असून विकास कामे थांबणार नाहीत . अडीज वर्षात आधीच्या सरकारने किती निधी दिला व त्या आधीचे आमचे सरकार व आताचे सरकार यांनी किती निधी दिला याचा हिशोब मांडला तर कळेल कि कामे कोण करते असा टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचे नाव न घेता लगावला .  

काँक्रीट रस्त्यां मुळे शहर खड्डे मुक्त होणार आहे . शहराला ५० इलेक्ट्रिक बस शासन देईल . सीसीटीव्हीचे इंटिग्रेटेड कमांड सेंटर नाही. शासना कडून निधी देऊन अतिशय चांगले सर्व्हिलन्स सेंटर सुरु होईल .  कर्करोग वर उपचार करणारे परिपूर्ण रुग्णालय व्हावे व त्यासाठी शासन लागेल ते अर्थ सहाय्य देईल . शहरात जैन धर्मगुरू आचार्य, मुनिजन यांचे वास्तव्य असते .  हे एक मोठे विचारपीठ असून विशेषतः जैन आचार्य यांच्या माध्यमातून पाहायला मिळते . अश्या लोकांची सोय होईल असे महावीर भवन चे भूमिपूजन केल्याचे फडणवीस म्हणाले.

Web Title: Meera Bhayander to be developed as central hub after Mumbai - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.