Join us  

मीरा-भाईंदरला पुढच्या वर्षी मिळणार सूर्याचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 10:57 AM

प्रकल्प रखडला, तीनपैकी एका बोगद्याचेच काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सहा वर्षांहून अधिक काळ रखडललेल्या सूर्या प्रकल्पातून यंदा वसई-विरारवासीयांची दिवाळी साजरी झाली, पण मीरा-भाईंदरला मात्र या पाण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत वाटा पाहावी लागेल. मीरा-भाईंदरला पाणी पोहोचवण्यासाठी जे तीन बोगदे बांधले जात आहे, त्यातील एकाचेच काम अद्याप पूर्ण झाले आहे. अनेक वर्षांपासून पाण्यासाठी झगडणाऱ्या वसई-विरारवासीयांची तहान भागली. दररोज १८५ दशलक्ष लीटर पाणी सूर्या प्रकल्पातून सोडले जात असल्याने तेथील रहिवाशांना काहीअंशी दिलासा मिळाला. 

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरांतील पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत मीरा रोड-भाईंदरला दररोज २१८ दशलक्ष लीटर, तर वसई-विरारला दररोज १८५ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन एमएमआरडीएने ठेवले असून, प्रकल्पासाठी १३२५.७८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे काम २०१७ साली हाती घेण्यात आले. हा प्रकल्प याआधीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हा प्रकल्प रखडला. आता या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनाया प्रकल्पातील वसई-विरारसाठीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून दोनदा वेळ देण्यात आली. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्याने पुन्हा लोकार्पण रखडले. अखेर वसई-विरारकरांची पाण्याची गरज लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याच्या सूचना एमएमआरडीएला दिल्या. 

मेंढवणखिंडचा बोगदा तयारया प्रकल्पात एक बोगदा पहिल्या टप्प्यात आणि इतर दोन बोगदे दुसऱ्या टप्प्यात आहेत. मेंढवणखिंड येथील पहिल्या टप्प्यातील बोगदा पाणीपुरवठ्यासाठी तयार आहे. एमएमआरडीएने २.८५ मीटर अंतर्गत व्यासाच्या आणि ४.६ किमी लांबीच्या तुंगारेश्वर बोगद्याचे काम पूर्ण करून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या बोगद्याद्वारे पाणी चेने येथील  (एमबीआर) मध्ये वळवून त्यातून मीरा-भाईंदर महापालिकेस पाणीपुरवठा केला जाईल. हे काम सुरू करण्यासाठी इनलेट आणि आउटलेटमध्ये मध्ये १० मीटर व्यासाचे दोन शाफ्ट बांधून आधुनिक टनेल बोरिंग मशीन वापरून भुयारीकरण करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईपाणी