मुंबई - अर्थतज्ञ आणि भारतातील स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचे निधन झाले. मुंबईच्या रहिवाशी असलेल्या मीरा सन्याल यांना कर्करोगाचा आजार होता, या दीर्घ आजारामुळेच वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सन 2014 मध्ये आम आदमी पक्षांकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी आपले बँकींग क्षेत्रातील करिअर सोडले होते.
मीरा सन्याल यांनी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत दक्षिण मुंबईतून आम आदमी पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज भरला होता. तत्पूर्वी 2009 मध्येही त्यांनी दक्षिण मुंबईतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नुकतेच नोव्हेंबर महिन्यात त्यांनी नोटाबंदीशी संबधित The Big Reverse नावाने एक पुस्तकही प्रकाशित केले होते. दरम्यान, मीरा यांच्या निधनानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विटवरुन दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.