विधि परीक्षेला एमकेईएस कॉलेजचा विद्यार्थ्यांना त्रास, नैसर्गिक विधीसाठी विद्यार्थ्यांना मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 02:07 AM2019-01-08T02:07:01+5:302019-01-08T02:07:30+5:30
नैसर्गिक विधीसाठी विद्यार्थ्यांना मज्जाव : विद्यापीठाच्या नियमांवर बोट
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधि विभागाच्या परीक्षा सुरू असून पहिल्या पेपरला उडालेल्या गोंधळानंतर आता दुसऱ्या पेपरचाही गोंधळ समोर आला आहे. परीक्षा सुरू झाल्यावर कोणत्याही विद्यार्थ्याला पुढील तीन तास वर्गाबाहेर सोडणार नसल्याची ताकीद एमकेईएस महाविद्यालयात परीक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी प्राचार्या वंदना दुबे यांनी दिली. यावर अनेक विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आणि विरोध केला. मात्र या मुंबई विद्यापीठाच्या सूचना असून आपण त्या निर्देशानुसार हे करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत विद्यार्थी संघटनांकडे धाव घेतली आहे.
सोमवारी सकाळी १०.१५ वाजता एमकेईएस हा प्रकार समोर आला. विधि महाविद्यालयाच्या या परीक्षेला तरुण वर्गासोबत अनेक ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थिनीही मोठ्या प्रमाणात बसले आहेत. परीक्षा सुरू होण्याच्या आधी विद्यार्थिनीला असलेल्या त्रासाबाबत तिने प्राचार्यांना सांगितले असता, प्राचार्यांनी नियमांचा धाक दाखवत विद्यार्थ्यांशी वाद घातल्याची माहिती विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. परीक्षा संपल्यावर सदर विद्यार्थिनी रडत गेल्याची माहितीही देण्यात आली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या या नियमाला विरोध दर्शविला आहे. महाविद्यालयांच्या किंवा विद्यापीठाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मध्येच बाहेर न जाऊ देणे हे योग्य असले तरी कधी कधी नैसर्गिक विधीवर नियंत्रण ठेवणे कठीण असते. विद्यार्थिनीच्या बाबतीत तर त्या दिवसांत कठीण होऊ शकते. या गोष्टी महाविद्यालयीन प्राचार्यानी आणि मुंबई विद्यापीठाने समजून घ्यायला हव्यात, असे मत स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी मांडले.
मुंबई विद्यापीठाचे असे काही नियम असतीलच तर त्यांनी विद्यार्थ्यांचा विचार करून ते बदलावेत. विद्यापीठाने या प्राचार्यांविरुद्धही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी कुलगुरूंकडे केली आहे, असेही ते म्हणाले आहेत.
याआधीही परीक्षेला विद्यार्थिनी त्रस्त
त्याच सेंटरवरील आणखी एका विद्यर्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, याआधीच्या परीक्षेलाही एका विद्यार्थिनीच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. विद्यार्थिनीने सोबत महिला अधीक्षक पाठविण्यास सांगूनही तिला सोडण्यात आले नाही. ज्या नियमांचा विद्यार्थ्यांना त्रास होत असेल अशा नियमांचा विद्यापीठाने पुन्हा विचार करायला हवा, असे मत विद्यार्थी मांडत आहेत. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाचे संचालक अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.