नोकरीसाठी ‘भारत श्री’ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
By Admin | Published: March 9, 2017 03:50 AM2017-03-09T03:50:34+5:302017-03-09T03:50:34+5:30
देशातील बहुतेक नामांकित खेळाडूंना आजही नोकरीसाठी अनेकदा सरकारच्या पायऱ्यांवर फेऱ्या माराव्या लागतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला जेव्हा, दोनवेळचा ‘भारत श्री’
- रोहित नाईक, मुंबई
देशातील बहुतेक नामांकित खेळाडूंना आजही नोकरीसाठी अनेकदा सरकारच्या पायऱ्यांवर फेऱ्या माराव्या लागतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला जेव्हा, दोनवेळचा ‘भारत श्री’ आणि तब्बल चार वेळचा ‘महाराष्ट्र श्री’ ठरलेल्या सुनीत जाधवने विधिमंडळ अधिवेशनामध्ये नोकरीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सुनीतला नोकरीसाठी सरकार दरबारी जावे लागणे, हे सरकारच्या उदासीनतेचे उत्तम उदाहरणच आहे, असे म्हणावे लागेल. आंतरराष्ट्रीय विजेत्या खेळाडूचा राज्य शासनाने सम्मान करून त्याला नोकरीत सामावून घेण्याऐवजी सुनीतला सरकारी नोकरीसाठी याचना करावी लागत आहे.
सध्या देशाचा सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटू असलेल्या सुनीतने देशांतर्गत स्पर्धेत विजेतेपदांचा धडाकाच लावला. त्याने नुकताच सलग चौथ्यांदा महाराष्ट्र श्री किताब पटकावल्यानंतर सलग दुसऱ्यांदा भारत श्री किताबावर नाव कोरले. शिवाय त्याच्या खात्यात मिस्टर वर्ल्ड, मिस्टर आशिया व मिस्टर दुबई ही पदकेही आहेत. मात्र तरीही त्याला सरकारी नोकरीचे यश लाभले नव्हते.
विशेष म्हणजे, सरकारी नोकरीसाठी मी २०१४पासून प्रयत्न करीत असल्याचे माहिती सुनीतने ‘लोकमत’ला दिली. गेल्या वर्षीच रोहा (रायगड) येथे झालेल्या ‘भारत श्री’ स्पर्धेत बाजी मारल्यानंतर स्पर्धा आयोजक अनिकेत तटकरे यांनी सुनीतला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास मदत केली. दरम्यान, सुनीतने मुख्यमंत्र्यांकडे क्लास वन आॅफिसर नोकरीची मागणी केली असून, मुख्यमंत्र्यांनीही त्याला नोकरीचे आश्वासन दिले आहे. तसेच, सरकारकडून निश्चितच मला नोकरी मिळेल. मुख्यमंत्री माझी निराशा करणार नाही, अशी आशाही सुनीतने व्यक्त केली. सुनीत सध्या व्यायामाचे वैयक्तिक प्रशिक्षण देऊन आणि राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील रोख पारितोषिकांतून आपली आर्थिक बाजू सांभाळत आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या भेटीसाठी मोठी गर्दी असतानाही त्यांनी आम्हाला बोलावून घेतले. शिवाय मुख्यमंत्र्यांनी सुनीतचा सत्कार करून त्याच्या नोकरीसाठी स्वत:हून प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासनही दिले. त्यामुळे, नक्कीच सुनीतला नोकरी मिळेल याची खात्री आहे. सुनीतची कामगिरी पाहता तो सरकारी नोकरीसाठी पात्र आहे.
- चेतन पाठारे, जनरल सेक्रेटरी -
इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन