‘फ्लेमिंगो फेस्टिव्हल’मध्ये भेट गुलाबी पाहुण्यांशी

By admin | Published: April 17, 2017 03:59 AM2017-04-17T03:59:51+5:302017-04-17T03:59:51+5:30

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे २२ एप्रिल रोजी शिवडी येथे फ्लेमिंगो फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हा वार्षिक सोहळा फ्लेमिंगो

Meet the Pink Guests at the 'Flamingo Festival' | ‘फ्लेमिंगो फेस्टिव्हल’मध्ये भेट गुलाबी पाहुण्यांशी

‘फ्लेमिंगो फेस्टिव्हल’मध्ये भेट गुलाबी पाहुण्यांशी

Next

मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे २२ एप्रिल रोजी शिवडी येथे फ्लेमिंगो फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हा वार्षिक सोहळा फ्लेमिंगो, तसेच इतर पाणपक्षी बघण्याची संधी तर घेऊन येतोच, पण त्याचबरोबर अनेकविध शैक्षणिक उपक्रमदेखील या दिवशी घेतले जातात. विशेष म्हणजे, या वेळी बीएनएचएसची तज्ज्ञ मंडळीही पक्षीप्रेमींना माहिती देण्यासाठी उपलब्ध असणार असून, या प्रसंगी दीपक दलाल यांच्या ‘फ्लेमिंगो इन माय गार्डन’ या पुस्तकाचे खास वाचनदेखील करण्यात येणार आहे.
शिवडी धक्क्याजवळचा दलदलीचा प्रदेश म्हणजे पक्षीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी. ‘फ्लेमिंगो फेस्टिव्हल’च्या निमित्ताने पक्षीप्रेमींना २० हजार फ्लेमिंगो व्यतिरिक्त पक्षी आणि पाणथळ पक्षी पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे, हा सोहळा मोफत असून, २२ एप्रिलला शिवडी रेल्वे स्टेशन (पूर्व) पासून धक्क्यापर्यंत सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत नि:शुल्क बस सेवाही आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, येथे दिवसभरात बीएनएचएस तज्ज्ञाद्वारे अनेकविध शैक्षणिक व माहितीपूर्वक उपक्रम राबवले जातील. फ्लेमिंगो फेस्टिवलमध्ये या वर्षी दीपक दलाल हे प्रचलित लेखक आपल्या ‘फ्लेमिंगो इन माय गार्डन’ या पुस्तकाचे खास वाचन करणार आहेत. उपस्थितांना शैक्षणिक खेळांतून, मनोरंजक प्रश्नमंजुषेतून, प्रदर्शनातून, तसेच ‘स्पॅन युवर विंग्स’ अशा उपक्रमांतून पक्षी व पाणथळ परीसंस्थेसंबंधी माहिती मिळू शकेल. फ्लेमिंगोचे मनसोक्त दर्शन घेण्याव्यतिरिक्त स्थानिक व स्थलांतरित अनेक पक्षी जसे बगळे, पाणकावळा, शराटी, कुरव, सुरय, चिखल्या, तुतारी व धीवर यांच्या प्रजाती पक्षीनिरीक्षकांच्या सहाय्याने पाहाता येतील. (प्रतिनिधी)

शिवडीचे महत्त्व : बीएनएचएसने कित्येक वर्षांच्या अभ्यासानंतर, शिवडी-माहुल चिख्खलपट्ट्याला ‘महत्त्वाचे पक्षी व जैवविविध क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. पश्चिम भारतातील पाणपक्ष्यांचे सर्वात मोठे एकत्रीकरण या क्षेत्रात आढळते. येथे वाढणारी नील-हरित शेवाळे व इतर पाणकृमी पक्ष्यांसाठी प्रमुख खाद्य ठरतात. त्यामुळे अनेक स्थलांतरित पक्षी येथे येतात. शिवडी येथील खाडी, खारफुटी व चिख्खलपट्टा हा संयुक्त अधिवास मत्स्य व्यवसाय व सागरी लाटांपासून संरक्षण या दोन्ही गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

Web Title: Meet the Pink Guests at the 'Flamingo Festival'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.