सॅटीसला फेरीवाल्यांचा विळखा
By admin | Published: February 28, 2015 11:00 PM2015-02-28T23:00:25+5:302015-02-28T23:00:25+5:30
सॅटीस परिसर फेरीवाला धोरणांतर्गत नो-हॉकिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील या परिसरात फेरीवाले असणार नाहीत,
ठाणे : सॅटीस परिसर फेरीवाला धोरणांतर्गत नो-हॉकिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील या परिसरात फेरीवाले असणार नाहीत, याची हमी दिली होती. त्यानुसार, गेले काही दिवस या परिसरातून फेरीवाले हद्दपार झाले होते. परंतु, आता पुन्हा फेरीवाल्यांनी सॅटीसवर पुन्हा अतिक्रमण केले आहे.
स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी सुटावी, यासाठी सॅटीसची निर्मिती करण्यात आली. परंतु, अद्यापही येथील ती सुटलेली नाही. असे असले तरी या भागात फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे या सॅटीसचा लूक हरविला होता. तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी हा परिसर फेरीवालामुक्त करताना तीन शिफ्टमध्ये येथे कर्मचारी ठेवले होते. त्यामुळे येथून ते हद्दपार झाले होते. परंतु, पुन्हा येथे त्यांनी आपले साम्राज्य निर्माण केले आहेत. तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात त्यांनी पुन्हा आपले बस्तान मांडले. अखेर, यासंदर्भात स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर आणि पालिकेचे फेरीवाला धोरण अंतिम होत असताना त्यांनी सॅटीस परिसर ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केला़ नवीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामुळे काही दिवसांपूर्वी स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी संपली होती. व तो फेरीवालामुक्तही झाला होता. आता पुन्हा त्यांनी आपले बस्तान मांडले आहे. (प्रतिनिधी)
सॅटीसवरील पादचारी पूल जो नौपाड्याच्या दिशेने खाली उतरतो, त्या ठिकाणी फेरीवाले जोमाने आपला व्यवसाय करताना दिसतात. तसेच रेल्वे फलाटांवरदेखील त्यांचे बस्तान आहे.
यासंदर्भात पालिकेला विचारणा केली असता ती रेल्वेची हद्द असल्याने आम्ही त्यावर कारवाई करू शकत नसल्याचे सांगून तिने काढता पाय घेतला. परंतु, आता सॅटीसच्या खाली आणि वर काही ठिकाणी फेरिवाल्यांचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे.
विशेष म्हणजे पालिकेची अतिक्रमण विभागाची गाडी कारवाईसाठी गेल्यास आधीच त्यांना त्याची माहिती दिली जात असल्याने ते काही वेळेसाठी गायब झालेले दिसतात़ मात्र, पुन्हा जैसे थे परिस्थिती होते़