Join us  

मुंबईतील हॉटेलमध्ये बैठक; ठाकरे-पवारांच्या पक्षाचं विधानसभेच्या जागावाटपावर काय ठरलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 1:46 PM

विधानसभा निवडणुकीत समसमान जागा लढवण्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आग्रही असल्याचे समजते.

Mahavikas Aghadi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर मविआतील तिन्ही पक्षांनी आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांचा निर्धार असला तरी कोणता पक्ष किती जागा लढवणार, याबाबत अद्याप विचारमंथन सुरू आहे. अशातच दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपाबाबत सखोल चर्चा झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका हॉटेलमध्ये महाविकास आघाडीतील या दोन पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. विधानसभेच्या ज्या जागांवर जो पक्ष मजबूत असेल त्याला ती जागा सोडण्यात यावी, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती आहे. तसंच या निवडणुकीत समसमान जागा लढवण्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आग्रही असल्याचे समजते.  त्यामुळे विधानसभेला मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० ते ९५ जागा लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत पक्षाची उद्या बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांसोबतही जागावाटपावर चर्चा केली जाणार आहे. याबाबत 'टीव्ही ९ मराठी'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, "लोकसभेला ४८ जागाच असल्याने आम्ही १० जागा घेतल्या. मात्र विधानसभेला असं चित्र नसेल," असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच आपला पक्ष लोकसभेप्रमाणे विधानसभेला नमती भूमिका घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

महायुतीत काय आहे जागावाटपाचं चित्र?

महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८० ते ९० जागांची मागणी केली जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून १०० जागा मिळाव्यात, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने महायुतीत आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलेलं दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्व केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील भाजप नेत्यांनी आपण विधानसभेला कमीत कमी १८० जागा लढायला हव्यात, अशी आग्रही मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला चांगलं यश मिळवायचं असेल तर महायुतीत आपल्या वाट्याला कमीत कमी १८० जागा यायला हव्यात, असा सूर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी पक्षाच्या बैठकीत आळवला होता. तसंच शिंदेंच्या शिवसेनेला ६० ते ७० जागा दिल्या जाव्यात आणि उर्वरित जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात याव्यात, असंही या नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांना कळवलं होतं.

 

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमहाविकास आघाडी