उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बंद दाराआड 20 मिनिटं चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 07:47 AM2018-11-20T07:47:55+5:302018-11-20T07:55:23+5:30
तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, अशीच काहीशी अवस्था शिवसेना आणि भाजपाची असल्याचे म्हणावं लागेल.
मुंबई - तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, अशीच काहीशी अवस्था शिवसेना आणि भाजपाची असल्याचे म्हणावं लागेल. कारण युतीच्या दोस्तीत दरदिवशी कुस्ती होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी (19 नोव्हेंबर) गोदावरी अर्बन बँकेच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाली. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेच्या नरिमन पॉईंट येथील शाखेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी त्याच इमारतीमधील एका हॉटेलमध्ये 15 ते 20 मिनिटे चर्चा केली. पण दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. कदाचित यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिवेशनादरम्यान शिवसेनेने सभागृहात सरकारला अडचणीत आणणारी भूमिका घेऊ नये, असे मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.