मुंबई : नोटबंदीच्या काळात भाजपकडून कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून दिल्या जात होत्या, त्यासाठी मुंबईत मंत्रालयात तत्कालिन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या कार्यालयात बैठक झाली असून त्यात अनिल राजगोर आणि डीसीपी वाडकर सहभागी होते, असा आरोप काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केल्याने या प्रकरणाची मंत्रालयात चर्चा रंगली.नोटबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतरच्या काळात हजार, पाचशेच्या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी भाजपच्या अहमदाबाद येथील कार्यालयात, मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये कशा बैठका घेण्यात आल्या, फुंडकर यांच्या दालनात ते नसताना ४ मार्च २०१७ रोजी कशी बैठक झाली, अमित शहा यांच्याशी कोण भेट घालून देऊ म्हणाले यावर केलेल्या स्टिंग आॅपरेशनचा व्हीडिओ अॅड.सिब्बल यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत सादर केला.अनिल राजगोर हे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या नजीकचे होते. याबाबत राजगोर म्हणाले, काही लोक आॅपरेटरच्या माध्यमातून भेटायला आले होते, ते कॅनाडामधून निधी आणणार होते. त्यांना महाराष्टÑात गुंतवणूक करायची होती म्हणून ते चर्चा करण्यासाठी आले. त्यात नोटा बदलून देण्याविषयी कसलीही चर्चा झाली नाही. त्यांना कोकणातही गुंतवणूक करायची होती, तेव्हा तुमचे प्रकल्प चांगले असतील तर आम्ही नक्की मदत करु असे आपण त्यांना म्हणालो होतो पण ते नंतर आपल्याकडे आलेच नाहीत. यात उल्लेख असलेल्या डीसीपी वाडेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मंत्रालयात नोटबंदीत नोटा बदलण्यासाठी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 6:02 AM