मुंबई- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई महानगर पालिकेच्या मालाड पश्चिम येथील पी उत्तर विभाग कार्यालयात आज सकाळी पार पडली. या बैठकीला परिमंडळ चारचे सहआयुक्त विश्वास शंकरवार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, एस. आर. एचे मारकुनर, रिलायन्स, वाहतूक शाखेचे भोपले जगदीश , दिंडोशी व कुरार पोलीस स्टेशन अधीकारी, एमएमआरडीए, आरे, वानखाते, आरे प्रशासन, फिल्मसिटीचे सह संचालक संजय पाटील, मनपाच्या विवीध खात्याचे अधिकारी, शिंदे सेनेचे वैभव भराडकर, विष्णू सावंत, माजी नगरसेवका मनीषा पाटील, अँड. प्रथमेश आव्हाड, वारंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संतोष नगर, कुरार, पठाणवाडी, नागरी निवारा परिषद आदी विभागातील रस्ते, घनकचरा, पाणी, वाहतूक, पर्जन्य जलवाहीन्या, विकास नीयोजन अंतर्गत रस्ते, सध्या सुरु असलेली विकास कामे, आरे व वनक्षेत्र अंतर्गत प्रश्न आदी विवीध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात मालाड जलाशय ते क्रांती नगर, गोरेगाव ते मुलुंड लिंक रोड, पश्चिम महामार्ग ते बाण डोंगरी, मालाड खडक पाडा ते आय. टी पार्क येथील रस्त्याचे काम, मालाड कुरार रस्त्याचे रुंदीकरण येथील रस्ते, वनखात्याच्या जागेवरली झोपड्यांना मूलभूत सुविधा देणे, दिंडोशी आप्पापाडा मीनाताई ठाकरे उद्यानांचा विकास करणे, मालाड पूर्व हायवे जवळील शहीद विजय साळसकर उद्यानाचा विकास करणे, नागरी निवारा येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानांचा विकास करणे आदी विविध विषयांवर चर्चा करून या समस्या सोडवण्याच्या सूचना खासदार रवींद्र वायकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.