ज्वेलरी कामगार प्रश्नी तोडगा निघेना, कंपनी व्यवस्थापनासोबतची बैठक निष्फळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:18 AM2018-06-19T02:18:12+5:302018-06-19T02:18:12+5:30
अंधेरी (पू.) सीप्झमधील जेम्स अॅण्ड ज्वेलरी वर्कर्स युनियनच्या कामगारांनी रेनेसॉ ज्वेलरी लिमिटेड कंपनीविरुद्ध ११ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मुंबई : अंधेरी (पू.) सीप्झमधील जेम्स अॅण्ड ज्वेलरी वर्कर्स युनियनच्या कामगारांनी रेनेसॉ ज्वेलरी लिमिटेड कंपनीविरुद्ध ११ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सोमवारी कंपनीच्या व्यवस्थापनासोबत कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, बैठकीमध्ये कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे.
गेल्या तीन वर्षांपासून बंद केलेली पगारवाढ सुरू करावी, कायमस्वरूपी कामगारांना काम देण्यासाठी कायमस्वरूपी सुपरवायजरची नेमणूक व्हावी, दिवाळीचा बोनस देताना कामगारांमध्ये भेदभाव करू नये, कामगारांना २० टक्के बोनस देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी कामगारांचे उपोषण सुरू आहे.
सोमवारी सीप्झ क्रमांक एकच्या प्रवेशद्वाराजवळ रेनेसॉ ज्वेलरी लिमिटेड कंपनीविरुद्ध तीव्र निदर्शने करण्यात आली. परंतु, सोमवारच्या बैठकीत कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील, अशा इशारा जेम्स अॅण्ड ज्वेलरी वर्कर्स युनियनचे अध्यक्ष अनिल त्यागी यांनी दिला.