मुंबई, पुणे, नागपुरातील महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्यांनीही लावली हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या असून या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन होणार असले तरी या आधारावर पुढील अकरावी आणि इतर अभ्यासक्रमांच्या, शाखांच्या प्रवेश प्रक्रियेचा समतोल कसा साधायचा, हे राज्य शिक्षण मंडळापुढील मोठे आव्हान आहे. यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तज्ज्ञ, विविध विषयांतील व मंडळातील अभ्यासक, तसेच राज्याच्या विविध भागांतील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी यांच्यासोबत बैठका सुरू केल्या आहेत. अशाच एका बैठकीत सोमवारी राज्य मंडळ व इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी गुणांच्या समानीकरणासाठी प्रक्रियेत काही बदल केले जाऊ शकतात का ? विद्यार्थ्यांची एकच प्रवेश प्रक्रिया घेतली जाऊ शकते का ? अशा विविध पर्यायावर चर्चा झाली.
राज्यातील पुणे, नागपूर, मुंबईतील अनेक नामवंत महाविद्यालयांतील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षण मंडळातील अधिकारी या बैठकीला हजर हाेते. या बैठकीत अकरावी प्रवेशाच्या विविध पर्यायांवर तज्ज्ञ मंडळी व अभ्यासकांची मते व पर्याय जाणून घेण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्र्यांनी केला. या सर्व पर्याय व उपायांवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय होऊनच विद्यार्थिहिताचा अंतिम निर्णय दहावीनंतरच्या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात येईल, असे समजते.
राज्य मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणारे यंदा १६ लाख विद्यार्थी आणि इतर मंडळांचे विद्यार्थी असे जवळपास तब्बल १७ लाखांहून अधिक विद्यार्थी पुढच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेत सहभागी हाेतील. आधीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नामवंत महाविद्यालयांतील प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे अकरावी व इतर प्रवेश कसे आणि कोणत्या निकषांवर करायचे, यासाठी विविध पर्यायांची चाचपणी शिक्षण विभाग करत आहे.
* असे असू शकतात पर्याय
- अंतर्गत मूल्यमापन करताना सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या अंतर्गत मूल्यमापनाचे निकष बघून राज्यातील मंडळाच्या विद्यार्थ्यांना गुण देऊन उत्तीर्ण करून अकरावी प्रवेश गुणांच्या आधारे दिला जाऊ शकतो.
-राज्य मंडळाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये समानता आणण्यासाठी बहुपर्यायी परीक्षा घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय विचारत घेतला जाऊ शकतो.
-आठवी, नववी आणि दहावी संयुक्त मूल्यपामन करून अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल दिला जाऊ शकतो. याच निकालाच्या आधारावर पुढील अकरावीसह इतर प्रवेश प्रक्रियांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, असा पर्यायही विचाराधीन आहे.
....................