मुंबई करणार पोर्टब्लेअर पालिकेला मदत, आॅनलाइन परवानगीसाठी १० नोव्हेंबरला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 06:25 AM2017-11-01T06:25:38+5:302017-11-01T06:25:47+5:30
महापालिका क्षेत्रात इमारत बांधकाम परवानग्यांचे सुलभीकरण १ जानेवारी २०१६ पासून प्रत्यक्षात आले आहे. ही प्रक्रिया यापूर्वीच आॅनलाइन करण्यात आली आहे. देशातील या प्रकारच्या या पहिल्या प्रयोगाची दखल राष्ट्रीय स्तरावरदेखील घेतली जात आहे.
मुंबई : महापालिका क्षेत्रात इमारत बांधकाम परवानग्यांचे सुलभीकरण १ जानेवारी २०१६ पासून प्रत्यक्षात आले आहे. ही प्रक्रिया यापूर्वीच आॅनलाइन करण्यात आली आहे. देशातील या प्रकारच्या या पहिल्या प्रयोगाची दखल राष्ट्रीय स्तरावरदेखील घेतली जात आहे. याबाबत केंद्र सरकारच्या गृह व शहरी कार्य विभागाच्या सूचनेनुसार, पोर्टब्लेअर पालिकेने नुकतीच मुंबई महापालिकेला सहकार्यासाठी विनंती केली आहे.
पोर्टब्लेअर पालिकेचे सचिव यशपाल गर्ग यांचे विनंती पत्र ईमेलद्वारे मुंबई महापालिकेला प्राप्त झाले आहे. पत्रात नमूद केल्यानुसार, पोर्टब्लेअर शहरातील बांधकाम परवानगीची प्रक्रिया आॅनलाइन करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
याबाबत मुंबई महापालिकेचे सहकार्य घेण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या गृह व शहरी कार्य विभागाच्या सचिवांनी पोर्टब्लेअर पालिकेला दिल्या होत्या. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या धर्तीवरच पोर्टब्लेअर पालिकेने इमारत बांधकाम परवानगी आॅनलाइन करण्याच्या कार्यवाहीस सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, पोर्टब्लेअर पालिकेने हे काम करू इच्छिणाºयांकडून प्रस्तावपर विनंती मागविताना महापालिकेच्या धर्तीवर काम करावयाचे असल्याचा उल्लेख केला आहे. त्यानुसार, पोर्टब्लेअर पालिकेची निविदापूर्व बैठक १० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. बैठकीला महापालिकेच्या अधिकाºयांना पाठवावे, अशी विनंती पोर्टब्लेअर पालिकेद्वारे करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील इमारत बांधकाम परवानगीचे सुलभीकरण व आॅनलाइन पद्धती प्रत्यक्षात आल्यानंतर, परवानगीची संख्या ११९ वरून ५८ इतकी यापूर्वीच कमी झाली आहे.
परिणामी, २०१६ पासून एकूणच परवानगी प्रक्रिया वेगवान झाल्याने, प्रक्रिया कालावधीदेखील एका वर्षावरून ६० दिवसांवर आला आहे.
इमारत बांधकाम परवानगीची प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने उपलब्ध
असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना, तसेच घरखरेदी करणाºया नागरिकांना संबंधित माहिती सहजपणे उपलब्ध
होत आहे.
आयुक्त अजय मेहता यांनी यासाठी विकास व नियोजन खात्यातील संबंधित सहायक अभियंता संजय निर्मळ यांची, पोर्टब्लेअर पालिकेला सहकार्य करण्यासाठी नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.