ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 13 - भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट झाली असून त्यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाली. यामध्ये काही विशेष वाटत नसलं तरी महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेदेखील त्यावेळी अहमदाबादमध्ये उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे पक्षांतर्गत कुरघोडींमुळे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त येत आहे. त्यातच योगायोगाने हे तिन्ही नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये उपस्थित असल्याने राणेंच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळालं आहे.
"एबीपी माझा"ने दिलेल्या वृत्तानुसार नारायण राणे आणि मुख्यमंत्री किंवा अमित शाह यांच्या भेटीविषयी नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी कोणतीही चर्चा न करता अहमदाबादमधून रवाना झाले आहेत. नारायण राणे दुस-या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत हाच विषय चर्चेत होता का याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नारायण राणे यांची मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी भेट झाली का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, नारायण राणे अहमदाबादेतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अमित शहा यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने रवाना झाले होते. बैठकीतील माहिती समोर येत नसली तरी या बैठकीमुळे राज्यातील राजकीय उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
भेट झालीच नाही - मुख्यमंत्री
दरम्यान, नारायण राणे अहमदाबादेत मला किंवा भाजपाध्यक्ष अमित शाह यांना भेटलेच नाही, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याची अफवा असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ पक्षांतर करतो असा होत नाही. काँग्रेसमधल्याच काही लोकांनी माझ्या पक्षांतराची बातमी पसरवली आहे. मी काँग्रेसमध्येच आहे. पक्षांतर करतोय ही निव्वळ अफवा असे सांगत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांचे खंडन केले होते. काँग्रेसमध्ये न्याय मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मला आणि माझ्या कुटुंबाला डावलल जातेय असा आरोप त्यांनी केला होता.