मुंबई : काँग्रेस पक्षासह देशातील महत्वाच्या पक्षांनी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी (दि.१०) वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली. तसेच, बैठकीच्या तयारीचा आढावा घेतला.
राज्यातील महाविकास आघाडी मुंबईतील होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीची संयोजक आहे. आज महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वाकोला येथील ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली. तसेच, या बैठकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष माजी मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, शिवसेना खासदार संजय राऊत, खा. अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र वर्मा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, संदीप पांडे उपस्थित होते.
मुंबईतील 'इंडिया' आघाडीची बैठक यशस्वी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार असून या समितीत तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश असणार आहे. काँग्रेस पक्षातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा गट काम करणार असून मुंबईतील बैठक यशस्वी करण्यासाठी तिन्ही पक्ष जोमाने काम करत असल्याची माहिती नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खा. संजय निरूपम हे या समितीचे सदस्य असणार आहेत.