मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे. २०२४च्या दृष्टिकोनातून लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीत जागा वाटपाची सूत्र काय आहेत, याबाबतीत चर्चा होऊ शकते, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. या बैठकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित असणार आहे.
महाराष्ट्र राज्य हे भाजपाने लुटलेलं राज्य आहे. लुटीचं राज्य सरकार टिकत नाही, असा निशाणा देखील संजय राऊतांनी यावेळी भाजपावर साधला. कर्नाटकमध्ये जो निकाल लागलेला आहे तो जनतेचा कौल आहे. कर्नाटकमध्ये पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या इतर राज्यातील मुख्यमंत्री अशी सगळी आर्मी लावून सुध्दा त्या आर्मीचा पराभव कर्नाटकच्या जनतेने केला, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच कर्नाटक अभी झाकी है पूरा देश बाकी है..., असं म्हणत संजय राऊतांनी भाजपाला इशारा दिला.
देश आणि राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या फायली मी ईडीकडे पाठविल्या आहेत. सीबीआयकडे पाठविल्या आहेत. या राज्याचे गृहमंत्री भ्रष्टाचारांना गुन्हेगारांना कसे पाठीशी घालत आहेत हे मला दाखवायचं आहे. २०२४मध्ये जेव्हा सरकार बदललेलं असेल तेव्हा या सगळ्या कार्यवाही पुढे जातील, असं संजय राऊतांनी सांगितले. संजय राऊतांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देखील आजा पुन्हा भाष्य केलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही. आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करा असं सांगत आहोत, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.