मुंबई - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी तब्बल 12 दिवसांनी राज्यात पाऊल ठेवले. राजधानी मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे त्यांची जंगी स्वागत करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदारांचं आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. तर, भाजप नेते गिरीश महाजन, राम कदम आणि प्रसाद लाड यांच्यावर आमदारांच्या स्वागताची विशेष जबाबदारी होती. भाजप नेत्यांसोबत बंडखोर आमदारांची गळाभेट झाली. यावेळी, गुलाबराव पाटील यांना पाहून गिरीश महाजनांना आनंद झाला, तर अब्दुल सत्तारांचीही गळाभेट घेतली. माध्यमांशी बोलताना समदं ओक्केमधीय, अशी सांगोलास्टाईल प्रतिक्रिया महाजन यांनी दिली. दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदेगटाच्या आमदारांची बैठक संपन्न झाली.
मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलबाहेर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे दिग्गज नेते येथे पोहोचले होते. गिरीश महाजन, राम कदम हे शिवसेनेच्या आमदारांच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये प्रवेशद्वारावर उभे होते. यावेळी, प्रत्येक आमदाराचे हातात हात देऊन स्वागत होते होते. अब्दुल सत्तार यांना पाहून जळगावचे नेते आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांना आनंद झाला. त्यावेळी, गुलाबराव पाटील यांना हाक मारुन त्यांनी अब्दुल सत्तारांचे स्वागत केले. सत्तार यांना जादू की झप्पी दिली, यावेळी उदय सामंत हेही त्यांच्यासमवेत होते. यावेळी, माध्यमांशी बोलताना आनंदी-आनंद असल्याचे महाजन म्हणाले. तसेच, सांगोल्याच्या आमदारांना मिठी मारल्याचे सांगत, त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. दरम्यान, येथे भाजप आमदार आणि शिंदे गटातील आमदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. तर, मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांचं कौतुक केलं.
काय म्हणाले महाजन
आमदार शहाजी बापू पाटील यांच्याबद्दल विचारण्यात आलं असता, सगळे ओकेमध्ये आहेत. शहाजी बापूंना आम्ही कडकडून मिठी मारली, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली. तसेच, सगळेजण अतिशय खूश आहेत. एक वेगळा आनंद आणि जल्लोष सर्वांमध्ये दिसत आहे. विधानसभेत उद्या आमचे 170 पेक्षा जास्त आमदार असतील आणि मोठ्या बहुमताने आमचा अध्यक्ष निवडून येईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.