लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात भूमिका जाहीर केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून मनसे कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उगारला होता. कारवाई झालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवतीर्थ गाठले. या वेळी राज आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना शाबासकी दिली.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. भोंगे न उतरविल्यास दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलनाची तयारी चालविली होती. मात्र, पोलिसांनी आंदोलनापूर्वीच राज्यातील अनेक मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यात, काही कार्यकर्त्यांना तडीपारची नोटीस बजावण्यात आली होती. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईच्या विरोधात राज ठाकरे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सोमवारी नाशिकच्या अनेक मनसे कार्यकर्त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ हे निवासस्थान गाठले. या भेटीत या सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस कारवाई विरोधात नाराजी व्यक्त केली. सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी भेटीदरम्यान केली.
आता पुण्यात सभा
मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर आता राज ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. या दौऱ्याची आखणी सुरु असून लवकरच त्याची घोषणा करण्यात येणार आहे. या दौऱ्यामध्ये राज ठाकरे पुण्यात सभा घेण्यात येणार असून त्यासाठी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे परवानगीदेखील मागितली आहे.