सलोखा टिकवण्यासाठी भरविला जातो ‘सर्वधर्मीयांचा’ मेळावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 07:04 AM2018-04-05T07:04:08+5:302018-04-05T18:48:56+5:30
एके काळी कर्जतपर्यंत हद्द असलेले कुर्ला पोलीस ठाणे आजही तितकेच व्यस्त आणि संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी एक आहे. कायदा व सुव्यवस्था जपण्याची टांगती तलवार डोक्यावर असताना, येथील पोलिसांकडून सर्वधर्मीयांचा मेळावा भरवला जातो.
- मनीषा म्हात्रे
मुंबई - एके काळी कर्जतपर्यंत हद्द असलेले कुर्ला पोलीस ठाणे आजही तितकेच व्यस्त आणि संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी एक आहे. कायदा व सुव्यवस्था जपण्याची टांगती तलवार डोक्यावर असताना, येथील पोलिसांकडून सर्वधर्मीयांचा मेळावा भरवला जातो. याच मेळाव्यातून सर्वांना शांतीने, एकोप्याने राहण्याचा संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालासाहेब शेटे यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे.
१९४०मध्ये कर्जतपर्यंत कुर्ला पोलीस ठाण्याची हद्द होती. मुलुंड पोलीस ठाणे त्याची बीट चौकी म्हणून ओळखली जात असे. या भागात दोन गिरण्या होत्या. त्याच बाजूला भंगार विक्रीच्या व्यवसायात मुस्लीम आणि उत्तर भारतीयांचा लोंढा वाढला. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुर्ला पोलीस ठाण्याची निर्मिती झाली.
कालांतराने वाढत्या लोकसंख्येमुळे कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीवर मर्यादा आली. मात्र, आजही येथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान कायम आहे.
सुमारे पाच लाख लोकवस्तीचा भार कुर्ला पोलीस ठाण्यातील
२२९ पोलिसांच्या खांद्यावर आहे.
या परिसरात ४५ टक्के मुस्लीम
आणि ४५ टक्के हिंदू लोकवस्ती
आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था जपण्याचे आव्हान पोलिसांवर
असते. हिंदू, तसेच काही मुस्लीम संघटनांचे या परिसरात वर्चस्व असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे येथे त्वरित पडसाद उमटतात.
शेटे यांनी पदभार स्वीकारल्यापासून या ठिकाणी सर्वधर्मीयांचा मेळावा घेण्यास
सुरुवात केली. हा मेळावा सर्वधर्मीयांसाठी ‘दिवाळी मेळावा’ म्हणून प्रसिद्ध आहे. हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय बांधव या मेळाव्यात सहभागी होतात. एकमेकांना फराळ देत, सर्वांना एकोप्याने राहण्याचा संदेश देतात. शेटे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या उपक्रमाचे पोलीस दलातूनही कौतुक केले जाते.
गुन्ह्यांच्या उकलीचे प्रमाण वाढले
मोबाइल चोरी, मारहाण, घरफोडी, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण या ठिकाणी
अधिक आहे. त्याच तुलनेत गेल्या तीन
वर्षांत गुन्हे उकलीचे प्रमाणही वाढले
आहेत.
स्कायवॉकची मागणी...
कुर्ला रेल्वे स्थानक ते बीकेसीच्या दिशेने स्कायवॉक उभारावा, अशी मागणी पोलिसांसह स्थानिकांकडून होत आहे. जेणेकरून, रस्ता मोकळा होण्यास मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
प्रमुख ठिकाणे.. : भाभा रुग्णालय, मिठी नदी, कुर्ला रेल्वे स्थानक, कुर्ला बस डेपो, न्यू मील रोड, एस. गी. बर्वे मार्ग, फिटवाला कम्पाउंड, कुर्ला कोर्ट, ठाकूर धाम, आंबेडकर चौक, नशिबुल्ला कम्पाउंड, भालेकर वाडी, माकडवाला कम्पाउंड, किस्मतनगर, बुद्ध कॉलनीसह विविध महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.
पोलिसांसाठी जीम.. : शेटे यांनी कर्मचारी आणि पोलीस वसाहतीतील रहिवाशांसाठी जीम सुरू केले आहे. कामाबरोबरच आरोग्याकडेही लक्ष द्यावा, याकडे त्यांचा कल असतो, तसेच वैद्यकीय शिबिर, महिलांसाठी हळदीकुंकू असे उपक्रम राबविले जातात.
अफवांवर विश्वास ठेवू नका..
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. व्हायरल झालेल्या पोस्ट आणि व्हिडीओमागील सत्य पडताळून त्यावर प्रतिसाद द्या. चुकीच्या गोष्टींचा प्रचार करू नका.
- लालासाहेब शेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुर्ला पोलीस ठाणे
रोडरोमियोंनी घेतला धसका : कुर्ला रेल्वे स्थानक कुर्ला डेपोजवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत उतरते. त्यात बीकेसीकडे जाणाऱ्या गर्दीचीही यात भर पडते. गर्दीचा फायदा घेत, महिलांसोबत कोणी छेडछाड करू नये, यासाठी साध्या गणवेशातील पोलीसही गर्दीत सहभागी होतात आणि रोडरोमियोंवर लक्ष ठेवून असतात. या परिसरातील वाहतूक नियोजनाबरोबरच महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतात.