Join us

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ‘मीटिंग पॉइंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 6:10 AM

रेल्वे स्थानकात अनेक वेळा प्रवासी किंवा नातेवाईक भेटीसाठी ‘इंडिकेटरच्या खाली’ अथवा ‘स्थानक व्यवस्थापकाच्या गेटसमोर’ या ठिकाणी उभे राहण्याच्या सूचना करतात.

मुंबई : रेल्वे स्थानकात अनेक वेळा प्रवासी किंवा नातेवाईक भेटीसाठी ‘इंडिकेटरच्या खाली’ अथवा ‘स्थानक व्यवस्थापकाच्या गेटसमोर’ या ठिकाणी उभे राहण्याच्या सूचना करतात. हे टाळण्यासाठी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मीटिंग पॉइंट उभारण्याच्या सूचना केल्या.अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची पाहणी केली. या वेळी अनेक प्रवासी सुविधांचेउद्घाटन लोहाणी यांनी केले. बाहेरगावच्या प्रवाशांसाठी मेल-एक्स्प्रेस फलाटावर मध्य रेल्वेने ‘तुम्ही येथे आहात’ (यू आर हिअर) हा दिशादर्शक फलक लावला आहे. दिशादर्शक फलक पाहिल्यानंतर यात मीटिंग पॉइंटचीदेखील तरतूद करावी, याचा प्रवाशांना फायदा होईल,अशा सूचना अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांनी महाव्यवस्थापक शर्मा यांना दिल्या.सीएसएमटीसारख्या गर्दीच्या ठिकाणी मीटिंग पॉइंट उभारल्यामुळे प्रवाशांना एकमेकांना एखाद्या निश्चित स्थळी भेटणे शक्य होईल. गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल. याचबरोबर फलाटावरील अनावश्यक गर्दी टाळण्यासदेखील मदत होईल. मीटिंग पॉइंट उभारण्याबाबत जागेची उपलब्धता निश्चित करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.