सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग

By admin | Published: June 2, 2017 06:19 AM2017-06-02T06:19:05+5:302017-06-02T06:19:05+5:30

महापालिकेत सत्तेवर असूनही समान बळ असलेला भाजपा भविष्यात धोकादायक ठरू शकतो याची प्रचिती गुरुवारी शिवसेनेला

The meeting of the ruling party | सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग

सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेत सत्तेवर असूनही समान बळ असलेला भाजपा भविष्यात धोकादायक ठरू शकतो याची प्रचिती गुरुवारी शिवसेनेला आली. विकासात अडथळा ठरणारा मुलुंडमधील वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीपुढे मंजुरीसाठी पालिका प्रशासनाने आणला होता. या प्रस्तावावरून शिवसेना आणि भाजपात जुंपली. हे पहारेकरी नव्हे तर मारेकरी असल्याचा हल्ला चढवत शिवसेनेने सभात्याग केला. मात्र भाजपाने या विरोधाला न जुमानता हा प्रस्ताव मंजूर करून शिवसेनेचा पराभव केला. शिवसेनेच्या हाती सत्ता असताना भाजपाने प्रस्ताव मंजूर करून घेत आपली ताकद दाखवून दिली आहे.
मुलुंडमध्ये चिंधी बाजार मार्गावर अडथळा ठरणारा वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत गुरुवारी मंजुरीसाठी आला होता.
राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार २५ वृक्षांपर्यंत तोडण्याची परवानगी देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. मात्र हा अध्यादेशच बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप शिवसेनेने केला.
पालिका शाळांमधील खुर्च्यांसाठी सागवान लाकूड वापरण्यास भाजपाने काही दिवसांपूर्वी विरोध केला होता.
स्थायी समितीमध्ये या प्रस्तावावरून शिवसेना-भाजपामध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. खुर्च्यांसाठी वृक्ष तोडल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल, अशी भूमिका भाजपाने त्या वेळी घेतली होती.
मात्र आता भाजपाकडून मुलुंडमध्ये वृक्ष तोडण्याची घाई सुरू आहे, असा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला.
वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी पाच सदस्य आहेत. शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध करीत सभात्याग केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कप्तान मलिक यांनीही त्यांचे समर्थन करीत सभात्याग केला.
मात्र सत्ताधारी बाहेर पडताच भाजपाने सूत्र हाती घेत वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. या समितीमधील स्वीकृत सदस्यांचे सहकार्य यात त्यांना लाभले. परंतु समितीच्या बैठकीसाठी आवश्यक सदस्य संख्याबळ सभेत उपस्थित नसताना प्रस्ताव मंजूर होतोच कसा, असा सवाल शिवसेनेने केला आहे. प्रशासन भाजपाच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप सभागृह नेत्यांनी केला आहे.
या प्रकरणी शिवसेनेने विधी, पालिका प्रशासन आणि पर्यावरण खात्याकडे जाब मागितला आहे.

शिवसेनेचा पराभव

प्रतिष्ठेची ठरलेली महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपात बरोबरीत सुटली. मात्र राज्यात सत्ता टिकवण्यासाठी भाजपाने ऐनवेळी माघार घेतल्याने शिवसेनेला महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवता आला. मात्र समान संख्याबळामुळे उभय पक्षांमध्ये प्रत्येक प्रस्तावावरून रस्सीखेच सुरू असते. स्थायी समितीमध्ये भाजपाने अनेक वेळा शिवसेनेला अडचणीत आणले. कित्येक प्रस्तावांवर दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली आहे. मात्र भाजपाने गुरुवारी स्वबळावर प्रस्तावही मंजूर करून घेत शिवसेनेला हरवले, अशी चर्चा पालिका वर्तुळात  रंगली आहे.

भाजपाला धडा शिकवण्यासाठी मंत्रालयात धाव घेणार

भाजपाने केलेला हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या या प्रस्तावावर स्थगिती आणण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी थेट मंत्रालयात धाव घेण्याची तयारी सुरू आहे. भाजपाने दिलेल्या पर्यावरण खात्याबाबत नाराज असलेल्या शिवसेनेने या मंत्रिपदाचा वापर करून भाजपाला धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. पर्यावरणमंत्रिपदावर शिवसेना नेते रामदास कदम असल्याने हा प्रस्ताव त्यांच्यामार्फत रद्द करून घेण्याची शिवसेनेची व्यूहरचना आहे.

Web Title: The meeting of the ruling party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.