'पी-उत्तर' पूर्वेला पालिका कार्यालय बांधकामासाठी लवकरच बैठक, भातखळकरांच्या प्रश्नाला मंत्री सामंतांचं उत्तर
By मनोहर कुंभेजकर | Published: December 22, 2022 05:41 PM2022-12-22T17:41:46+5:302022-12-22T17:44:12+5:30
"अधिवेशन संपताच १५ दिवसात स्थानिक आमदारांसह संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार"
मुंबई - मुंबई महापालिकेच्या पी-उत्तर विभागातील पूर्वेला पालिकेच्या कार्यालयासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पालिकेची सुसज्ज वास्तू तयार करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाबरोबर संबंधित सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक तातडीने घ्यावी, अशी मागणी कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रभारी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशन संपताच १५ दिवसात स्थानिक आमदारांसह संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.
आमदार भातखळकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळलेला आहे. यापूर्वी अर्थसंकल्पात यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, जागेच्या उपलब्धते अभावी काम प्रत्यक्षात झालेले नाही. झोपडपट्टी पुनर्विकास योजना वर्षानुवर्षे रखडलेली आहे. तेथे पालिका कार्यालयासाठी जागा आरक्षित आहे. त्यामुळे या विषयावर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे अधिकारी, महापालिका अधिकारी, स्थानिक आमदार आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री महोदय यांची एक संयुक्त बैठक घ्यावी. तसेच याची कार्यवाही कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, आमदार भातखळकर यांनी मांडलेली भूमिका रास्त आहे. पालिकेमार्फतच पालिकेचे कार्यालय बांधता येईल का? याबाबत विचार केला जाईल. अधिवेशन संपताच १५ दिवसांच्या आत स्थानिक आमदार आणि सर्व अधिकाऱ्यांची बैठक आपण स्वत: घेऊ. प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.