- मनोहर कुंभेजकर
मुंबई: मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उद्या शनिवार दि,१ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर विरोट मोर्चा धडकणार आहे. या विराट मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख आदित्य़ ठाकरे करणार आहेत. उद्या दुपारी ४ वाजता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत असा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्च्याच्या तयारीसाठी शिवसेना भवन आणि मुंबईतील २२७ शाखा शाखांवर जोरदार बैठका सुरु आहेत.
या मोर्चाची जबाबदारी ही पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील १२ विभागप्रमुखांवर दिली आहे. ठाकरे गटाने मोर्चासाठी सर्व जय्यत तयारी सुरु केली आहे. विभागप्रमुख, महिला विभाग संघटक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, यांचे शाखा शाखांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. सेना भवनामध्ये सुद्धा बैठका सुरू आहेत.
खासदार, आमदार, माजी नगरसेवक मोर्चा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहे. तर युवा सेना सुद्धा या मोर्चाची तयारी करत आहे. तर शिवसेनेच्या अंगीकृत अनेक संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत.तसेच शिवसेनेच्या २२७ शाखांमधील अनेक वॉटसअप ग्रुप आणि सोशल मिडियावरून सुद्धा या मोर्चाचे व्हिडिओ, पोस्ट टाकण्यात येत असून सोशल मिडियावर देखिल या मोर्चाला येण्यासाठी आवाहन केले जात आहे. या मोर्चाद्वारे शिवसेना ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून उद्याच्या मोर्च्यात सुमारे ४०००० ते ५०००० शिवसैनिक येणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेच्या विरोधात शनिवारी निघणाऱ्या मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी विभागातील पदाधिका-यांनी कंबर कसली असून, शाखा-शाखांमध्ये शिवसैनिकांच्या बैठका घेण्यात येत आहेत व प्रत्येक शाखेतून १५० - २०० जण यायलाच पाहिजेत अशी मांडणी करून या बैठकांचे नियोजन केले जात आहे. शनिवारी होणाऱ्या मोर्चासाठी सर्व शिवसैनिक प्रामुख्याने रेल्वेने प्रवास करण्याचे बैठकीत ठरले असल्याचे कळते.
सत्तातंरानंतर ज्या प्रकारे महापालिकेचे प्रशासन कारभार करत आहे त्यावर मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये रोष असल्याचे बोलले जाते. या महापालिकेच्या प्रशासना आडून पैसा अडवा - पैसा जिरवा हे धोरण या सरकारचे आहे असे जनतेला पटवून देण्यात स्थानिक शाखेचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत आणि याचा निषेध म्हणून जनतेने मोठ्या प्रमाणात या मोर्चात सामिल व्हावे यासाठी शिवसैनिक प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईचे सौदर्यीकरण आणि विकास कामांच्या नावाने पालिकेच्या पैशांची उधळपट्टी आहे. पालिकेच्या ९५ हजार कोटी ठेवी होत्या. त्यापैकी वर्षभरात १६ हजार कोटी रुपये विकासाचा नावाने खर्च केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ही लूट रोखण्यासाठी आणि त्याबाबत जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.