राज्य सरकारसोबतची बैठक सकारात्मक; मात्र बेस्टच्या कामगारांंचा संप मिटेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 05:48 AM2019-01-13T05:48:09+5:302019-01-13T05:48:21+5:30
अजूनही ठोस निर्णय नाही; सोमवारी तोडगा निघण्याची शक्यता
मुंबई : सुधारित वेतन करार, दिवाळीतील सानुग्रह अनुदान, बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण यांसह उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारसोबत शनिवारी झालेल्या बैठकीतही ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी, बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप रविवारीही सुरूच राहणार असून, सोमवारी यावर ठोस तोडगा निघण्याची शक्यता आहे.
बेस्ट कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाची शनिवारी मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला मुख्य सचिव डी.के. जैन, परिवहन सचिव आशिष कुमार सिंग, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे उपस्थित होते. बैठकीदरम्यान बेस्ट कामगार कृती समितीचे शिष्टमंडळ आणि बेस्ट प्रशासनानेही सविस्तर म्हणणे सरकारसमोर मांडले. सरकारसोबत झालेली बैठक सकारात्मक झाली. मात्र मागण्या मान्य करण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे संप सुरूच राहणार आहे, अशी माहिती बेस्ट कामगार कृती समितीने ‘लोकमत’ला दिली.
लेखी दिल्याशिवाय संप मिटणार नाही
सुधारित वेतन करार, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण, कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न; अशा अनेक मागण्या बेस्ट कामगारांनी केल्या आहेत. या मागण्या अडीच वर्षे प्रलंबित आहेत. अडीच वर्षे कामगारांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. कामगारांमध्ये असंतोष
आहे. आश्वासनावरच बोळवण होत आहे. कामगारांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी दिल्याशिवाय संप मिटणार नाही, या भूमिकेवर बेस्ट कामगार कृती समिती ठाम आहे.