आघाडीच्या बैठकीत एकजुटीच्या आणाभाका, दुष्काळावर आक्रमक भूमिका घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:16 AM2019-05-29T05:16:57+5:302019-05-29T05:17:07+5:30
लोकसभा निवडणुकीतील पराभव बाजूला ठेवत एकजुटीने आणि सर्वशक्तीनिशी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाआघाडीतील नेत्यांनी मंगळवारी व्यक्त केला.
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभव बाजूला ठेवत एकजुटीने आणि सर्वशक्तीनिशी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाआघाडीतील नेत्यांनी मंगळवारी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीचे निकाल, आगामी विधानसभा निवडणूक आणि १५ दिवसांवर असलेल्या
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची बैठक झाली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाआघाडीच्या पुढील रणनीतीची चर्चा झाली. बैठकीस अशोक चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, नसीम खान, विजय वडेट्टीवार, सुनिल तटकरे, अबू आझमी, रवी राणा, हसन मुश्रीफ, शेकापचे जयंत पाटील, गणपतराव देशमुख, आदींसह आघाडीचे नेते उपस्थित होते. लोकसभेतील पराभव बाजूला ठेवत जोमाने विधानसभेची तयारीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
विधानसभा निवडणुका एकत्रच लढवायचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. जागावाटपाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. एखाद्या जागेवर मतभेद असल्यास फारसे ताणून धरू न धरता सामोपचाराने वेळेत त्याबाबत निर्णय घ्यावा, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे समजते. बैठकीच्या प्रारंभीच राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थीती निर्माण झाली असताना सत्ताधारी मात्र विजयाच्या उन्मादात मग्न आहेत. आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या नाहीत. अधिवेशनात दुष्काळी उपाययोजनांच्या मुद्दयावर सरकारला घेरण्याचा निर्णय महाआघाडीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.
>‘त्या’ आमदारांवर कारवाई करणार - अशोक चव्हाण
महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून, यासंदर्भात आणखी बैठका होतील. विखे पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपात जातील असे वाटत नाही. ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
>मनसेबाबत चर्चा नाही - जयंत पाटील
महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र त्यांचा प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत चर्चा झालेली नाही. मनसेला आघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आज चर्चा झाली नाही.
>पराभवाची जबाबदारी माझीच - पवार
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवाराच्या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझीच आहे. जनतेनं दिलेला कौल आपण स्वीकारला आहे. आता सर्वांनी विधानसभेला तयारीला लागायचे आहे.