Join us

माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:00 AM

माथाडी कामगारांच्या मान्य मागण्यांवर शासन निर्णय जाहीर करण्याची मागणी करत महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट, आणि जनरल कामगार युनियनने सोमवारी आझाद मैदानात बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे.

मुंबई : माथाडी कामगारांच्या मान्य मागण्यांवर शासन निर्णय जाहीर करण्याची मागणी करत महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट, आणि जनरल कामगार युनियनने सोमवारी आझाद मैदानात बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात मध्यस्थी करत वर्षा बंगल्यावर केलेल्या चर्चेनंतर मंगळवारी मंत्रालयात महसूल मंत्री, कामगार मंत्री आणि युनियनच्या शिष्टमंडळाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीनंतरच उपोषणाबाबत निर्णय जाहीर करू, अशी माहिती माथाडी कामगारांचे नेते व आमदार नरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पाटील म्हणाले की, माथाडी कामगारांच्या विविध मागण्या मान्य होऊनही त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे निर्णय जाहीर करून परिपत्रक निघत नाहीत, तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय माथाडी युनियनच्या पदाधिकारी व नेत्यांनी घेतला आहे. उपोषणादरम्यान माथाडी कामगारांचे काम सुरळीत सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवसभर उपोषण केल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत युनियनच्या शिष्टमंडळाची चर्चाही झाली. मात्र सर्व प्रश्न हे महसूल आणि कामगार खात्याशी संबंधित असल्याने मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंगळवारी दुपारी १२.३० वाजता बैठकीचे आयोजन केल्याचे पाटील यांनी सांगितले. परिणामी, मंगळवारीही उपोषण सुरू ठेवणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.सेना-भाजपामधील वादाचाही माथाडी कामगारांना फटका बसत असल्याचा आरोप युनियनने केला.>कासवगतीचे मंत्री!माथाडी कामगारांसाठी सल्लागार समितीची पुनर्रचना, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या मुलांना प्राधान्य, मंडळावर पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवाची नेमणूक अशा विविध मागण्या कामगार मंत्र्यांनी यापूर्वीच मान्य केल्याचा युनियनचा दावा आहे. मात्र शासन निर्णय जाहीर करण्यास विलंब करत असल्याचा युनियनचा आरोप आहे. कामगार मंत्र्यांकडून यासंदर्भात कासवगती कारभार सुरू असल्याने माथाडी कामगारांमध्ये रोष असल्याचे एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.