नेरळ : कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायतीत एकाच पक्षामध्ये जोरदार राजकीय उलथापालथ सुरू आहे. ग्रामसेविकेला पाठीशी घालत असल्याने आता ग्रामपंचायतीतील नऊपैकी सात सदस्यांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकत सभात्याग केला. या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत ग्रामसेविकेच्या बदलीची मागणी केली. ममदापूर ग्रामपंचायतीच्या २१ जानेवारी रोजी झालेल्या मासिक सभेचे इतिवृत्त ग्रामसेविका आणि सभेच्या सचिव मंगला केदारी यांनी वाचन करण्यास सुरुवात केली. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा बजावणे, विविध ठरावांचा उल्लेख करण्यात न आल्याने सदस्यांनी मागील सभेतील विषय इतिवृत्तात का आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर सरपंच स्वाती निरगुडा इतिवृत्तातील विषय योग्य असल्याचे सांगून ग्रामसेविका केदारी यांची पाठराखण केली. त्यानंतर उपसरपंच चंद्रकांत शिनारे यांनी ग्रामपंचायतीचे पासबुक पाहण्यासाठी मागविले. त्यावेळी सरपंच आणि ग्रामसेविकेने उपसरपंच किंवा सदस्यांना तसा कोणताही अधिकार नसल्याचे उत्तर दिले. मुद्रांक शुल्काची तीन लाखांच्या रकमेची नोंद झाली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी बुक मागितले, मात्र त्यात काही गोंधळ असल्याने ते दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला, तसेच आपण केवळ सरपंच सांगतील त्याचीच नोंद घेऊ, असे ग्रामसेविका मंगला केदारी यांनी सांगितल्याने सर्वांनी त्यांचा निषेध करीत सभात्याग केला.मासिक सभेला उपस्थित असलेल्या आठ सदस्यांपैकी सात सदस्यांचा यात समावेश होता, तर सभेला अनुपस्थित एक सदस्यही आम्हाला पाठिंबा देईल, असा विश्वास सभात्याग करणाऱ्या सदस्यांनी केला.
ग्रामसेविकेच्या बदलीसाठी सभात्याग
By admin | Published: February 27, 2015 10:28 PM