मुंबई-जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथून माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर आमदार म्हणून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. आगामी पालिका निवडणूक ही भाजपासाठी महत्त्वाची असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर दिल्लीच्या नेतृत्वाने येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची मोठी जबाबदारी टाकली आहे. ११४ जागा निवडून आणण्याचे मिशन त्यांच्यावर सोपवले आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात येत्या शुक्रवार,२० रोजी दुपारी तीन वाजता जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड,श्यामनगर तलाव येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने येत आहेत. विशेष म्हणजे आमदार रवींद्र वायकर यांच्या कार्यालयाजवळ ही सभा आयोजित केली आहे. यावेळी शक्ति प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर टीकेचे कोणते आसूढ ओढणार, याकडे जोगेश्वरीकरांचे व येथील भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
जोगेश्वरी नगरीत मंत्रीमहोदयांच्या स्वागताची जोरदार तयारी भाजपा जोगेश्वरी विधानसभा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट यांनी केली आहे. ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.