मुंबई - मुंबई विद्यापीठ प्रशासन आपल्या ६०/४० पॅटर्न राबविण्याच्या मतावर ठाम असल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅटर्नवर काल २४ सप्टेंबर रोजी विद्यार्थी संघटना आणि प्र कुलगुरू यांच्यात बैठक झाली असून ती फिस्कटली असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाने पुढील दोन दिवसांत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला नाही, तर आपण अधिक आक्रमक आंदोलन करणार असल्याची माहिती स्टुडन्ट लॉ कौन्सिलने दिली आहे.मुंबई विद्यापीठ प्रशासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लॉच्या अभ्यासक्रमासाठी ६०/४० पॅटर्न र्अमलात आणला होता. पण, विद्यापीठाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला. अखेर पुढील निर्णय होईपर्यंत मुंबई विद्यापीठाने या पॅटर्नला स्थगिती दिली आहे.मुंबई विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना पुढील निर्णय येईपर्यंत ६०/४० हा पॅटर्न राबवू नये अशा सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या मागणीमुळे विद्यापीठाचे प्र कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्यासोबत बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये विद्यार्थी संघटनांनी आपली बाजू मांडली.६०/४० पद्धती लागू करायची असल्यास प्रथम वर्र्षापासूनच लागू करण्याची बाजू विद्यार्थी संघटनांनी मांडली. मात्र हा निर्णय विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलमध्ये पारित झाल्यामुळे आता तो बदलू शकत नाही अशी बाजू विद्यापीठ प्रशासनाकडून मांडण्यात आल्याची माहिती स्टुडन्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.विद्यार्थ्यांपर्यंतमाहिती नाहीच...दरम्यान, ६०/४० पॅटर्नला मुंबई विद्यापीठाने तूर्तास स्थगिती दिली असून कोणतेही कॉलेज प्रशासन प्रोजेक्ट्स किंवा असिस्टमेंट्ससाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकू शकत नाही. कॉलेज प्रशासनाकडून ही माहिती नोटीस बोर्डवर किंवा वेबसाईटवर टाकणे अपेक्षित आहे; मात्र तसे होत नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
विद्यापीठ आणि विद्यार्थी संघटनांची बैठक फिस्कटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 5:28 AM