प्रचाराचा पहिला रविवार भेटीगाठींचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 03:42 AM2019-04-01T03:42:55+5:302019-04-01T03:43:24+5:30
उमेदवारी जाहीर नाही तरी प्रचाराची हौस : कुठे कार्यकर्ते एकत्र, तर कुठे अनुपस्थित
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अजून जोमाने सुरुवात झालेली नाही़ कारण अजून काही जणांची उमेदवारी निश्चित व्हायची आहे, तर काही नेते प्रचारासाठी मुंबईबाहेर आहेत़ त्यातूनही प्रचाराचा पहिला रविवार म्हणून उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या़ विशेष म्हणजे काही इच्छुक तर उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचारात सहाभागी झाले़ त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या़ तर काही ठिकाणी शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकत्र प्रचार करताना दिसले, तर काही ठिकाणी एकमेकांच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहून कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवला़
उमेदवार मतदारांच्या दारी
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी रविवारचा दिवस प्रचारासाठी सार्थकी लावला. मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासह प्रचार रॅलीच्या माध्यमातून दोन्ही उमेदवारांनी रविवारी प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली.
गोपाळ शेट्टी यांनी कांदिवली आणि मागठाणे विधानसभा येथे सायंकाळी प्रचार रॅली काढली होती. यावेळी त्यांनी दोन्ही विधानसभेमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येथे ग्रुप मिटिंगदेखील घेतल्या. नागरी सत्कार सोहळ्यालाही त्यांनी हजेरी लावली. येथील प्रत्येक समाजातील घटकांशी संवाद साधत शेट्टी यांनी त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. विशेषत: महिला वगार्शी संवाद साधत त्यांनी त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. गोपाळ शेट्टी २ एप्रिल रोजी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी बोरिवली येथे मोठी रॅली आयोजित करण्यात आली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी रविवारी कांदिवली पश्चिम येथील डहाणूकर वाडीतील आशुतोष शिर्के यांच्या शिर्के निकेतन बंगल्यात ‘मित्र लोकशाहीचे’ या संस्थेच्या सभासदांसोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, भाजप सरकारकडे पाच वर्षांचा हिशोब मागितला की ते त्यावर काहीच बोलत नाही. मग ते काँग्रेसचे मागचे काहीतरी काढत बसतात. गेल्या पाच वर्षात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. भाजपने अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे की लोकशाही वाचविण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी खूप मोठी चळवळ उभी करावी लागणार आहे. मी या चळवळीत उतरले आहे. तुम्ही सर्व जण सुद्धा सहभागी व्हा. खूप मोठया संख्येने या चळवळीत सामील व्हा, असेही आवाहनही त्यांनी केले.
कार्यकर्ता शिबिर, कामाची आखणी
उत्तर पूर्व मुंबईत भाजप उमेदवाराचा तिढा कायम असताना, रविवारी मुलुंड पासून सुरु झालेल्या ’मै भी चौकीदार’च्या कार रॅलीत, भाजपचे अडचणीत आलेले उमेदवार किरीट सोमय्या उतरले. लोकसभेत ज्याठिकाणाहून सर्वात कमी मत मिळाले त्याच ठिकाणी विविध शिबिरातून मतदारापर्यंत ते पोहचताना दिसले. तर राष्ट्रवादीने, ईशान्य मुंबईच्या महिला आघाडीचा मेळावा घेत, त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपवली.
ईशान्य मुंबईत, सेना- विरुद्ध सोमय्या सुरू असलेल्या वादामुळे मुलुंडपासून सकाळी साडेसातच्या सुमारास सुरु झालेल्या भाजपच्या कार रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी फिरकले देखील नाही. तर, दुसरीकडे या रॅलीत भाजपचे संभाव्य उमेदवार आणि लटकलेले उमेदवार प्रचारातच स्वत:ला पुढे करताना दिसले. उमेदवारी जाहीर झाली नसली तरी, त्यांनी प्रचाराची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बैठकांबरोबरच, स्थानिक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत घाम गाळताना दिसले. रखरखत्या उन्हात भाजपचे कार्यकर्ते, कमळ फुलवताना दिसले. १० वाजता भांडुप परिसरात चहापानाचा कार्यक्रम पार पडला.
२०१४ च्या निवडणूकीत, भाजपाला सर्वात कमी मते पडली अशा मानखुर्द शिवाजी नगर कडे रॅलीने मोर्चा वळवला.