Join us

मुंबईत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल; मनसेचा निवडणूक प्लान तयार! वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 2:20 PM

मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

मुंबई-

मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठीच्या रणनितीवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महत्वाची माहिती दिली आहे. 

मुंबईत मनसेकडून 'घे भरारी' अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मनसेनं केलेली आजवरची कामं आणि पक्षाची भूमिका लोकांना पटवून दिली जाणार आहे. तसंच मुंबईत एकूण ३६ विधानसभा मतदार संघ आहेत. या सर्व मतदार संघात पक्षाची किमान एक सभा आयोजित केली जाणार आहे. इतकंच नव्हे, तर सभेसाठीच्या वक्त्यांचीही यादी फायनल झाल्याची माहिती प्रकाश महाजन यांनी दिली. 

"मुंबई मनपाच्या निवडणुकीसंदर्भात आज पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत राज ठाकरेंनी बैठक घेतली. मुंबईत एकंदरीत ३६ विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघांमध्ये 'घे भरारी' अभियान राबवण्यात येईल. तसंच प्रत्येक मतदार संघात एक आमची जाहीर सभा होईल आणि आमची धारणा स्वबळावर निवडणुका लढवण्याची आहे. त्या हिशोबानंच आमची तयारी सुरू आहे. सभेसाठीच्या वक्त्यांची यादीही फायनल झाली आहे", असं प्रकाश महाजन म्हणाले.   

मनसे स्वबळावर लढणारमनसे, भाजप आणि शिंदे गटाची जवळीक वाढलेली असताना मुंबई मनपा निवडणुकीत नवं समीकरण पाहायला मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण सध्या तरी मनसेकडून कोणत्याही युतीचा विचार केला गेलेला नाही. मनसे स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीकोनातूनच निवडणुकीची तयारी करत आहे. आजच्या बैठकीनंतर प्रकाश महाजन यांनीही स्वबळाचाच नारा दिला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :राज ठाकरेमनसे