Join us

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या नियोजनावर बैठका सुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:06 AM

पर्यवेक्षक चाचण्या, सुविधा यांवर येत्या २-३ दिवसांत निर्णयाची अपेक्षालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ...

पर्यवेक्षक चाचण्या, सुविधा यांवर येत्या २-३ दिवसांत निर्णयाची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध आणि शनिवारी, रविवार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहेत; मात्र नियमांप्रमाणे शनिवारी लॉकडाऊन काळात येणाऱ्या परीक्षांचे काय? आरटीपीसीआर चाचण्या ४८ तास वैद्य असल्यास पुढील चाचण्यांच्या नियोजनाचे काय? विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा या कशा आणि प्रत्येक केंद्रावर किती यासंदर्भात अद्याप काही स्पष्टता शिक्षण विभागाकडून नाही. यासाठी तसेच नववी, अकरावीच्या परीक्षांसंदर्भातील निर्णयासाठी शिक्षण विभागाच्या शिक्षणतज्ज्ञ व अधिकारी यांच्यासोबत बैठका सुरू आहेत. यासंदर्भातील स्पष्ट निर्देश व मार्गदर्शक सूचना येत्या ३ ते ४ दिवसांत शिक्षण विभागाकडून अपेक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक ते प्रवेशपत्र परीक्षेसाठी जाताना सोबत असल्यास त्यांना रात्री ८ नंतर प्रवास करता येणार आहे तसेच शनिवारीही तशी सोय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहील, असे आज जाहीर केलेल्या शासनाच्या नवीन निर्देशांक म्हटले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाकडून यासंदर्भात काय? मार्गदर्शक सूचना येतात याकडे पालकांचे आणि संस्थाचालक, मुख्याध्यापक, शाळा व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय दहावी, बारावीच्या परीक्षांना उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षक यांच्या लसीकरणाचे काय? किती दिवसांनी व केव्हा सुरू होणार? वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय? उपाययोजना केंद्रांवर केल्या जाणार यावरही कसे नियोजन करायचे याची चर्चा शिक्षण विभाग करून लवकरच त्यासंदर्भात सूचना जारी करणार असल्याची माहिती आहे.

सध्याचे नियोजन

दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने होण्याच्या निर्णयावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम असून, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, आरोग्याची, सुरक्षिततेची काळजी घेता यावी म्हणून यंदा त्यांच्याच शाळा-महाविद्यालयांत परीक्षेचे केंद्र असणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये योग्य सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी यंदा अर्ध्या तासाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना संसर्ग किंवा इतर कोणत्याही कारणास्तव परीक्षेला मुकावे लागले तर जूनमधील विशेष परीक्षेची संधी त्याला मिळू शकणार आहे.

राज्यातील परीक्षांची सद्य:स्थिती

-पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द. वर्गोन्नतीच्या मार्गदर्शक सूचना एससीईआरटी जाहीर करणार

- नववी व अकरावी - लवकरच निर्णय अपेक्षित

-दहावीच्या लेखी परीक्षा - २९ एप्रिल ते २० मे

-बारावीच्या लेखी परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे