राज्यात लॉकडाऊन नाही, पण 'या'साठी आता परवानगी मिळणार नाही; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश
By मुकेश चव्हाण | Published: February 16, 2021 08:29 PM2021-02-16T20:29:21+5:302021-02-16T20:36:37+5:30
राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे.
मुंबई: मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. या दोन आठवड्यात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.
गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथीलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहे.
राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही. लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, असं म्हणत लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असं राज्यातील प्रशासनाकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का. याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्णसंख्या वाढतेय तेथे कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनाची लस केव्हा घेणार? राजेश टोपेंनी सांगितले त्यांची परवानगी आली की लगेच....https://t.co/86B27TTNW2#SurJyotsnaAwards2021@rajeshtope11@CMOMaharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) February 16, 2021
दरम्यान, मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली. तेव्हापासून कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे, असं मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. लोक स्वत:ची काळजी घेत नसतील तर लॉकडाऊन करण्याची वेळ येईल. तशी चिंता राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. प्रत्येकानं स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना जपायला हवं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक काळजी घ्यायला हवी. तरच आपण कोरोनाची दुसरी लाट थोपवू शकू, असंही पेडणेकर म्हणाल्या.