पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या बैठका तीनवेळा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 08:29 PM2020-10-28T20:29:51+5:302020-10-28T20:30:15+5:30
कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी; मुख्यमंत्र्यांबरोबर कामगार संघटनांची शुक्रवारी बैठक
मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान मिळावा, अशी मागणी पालिका कर्मचारी संघटनांनी केली आहे. मात्र आतापर्यंत तीनवेळा बैठकीची वेळ निश्चित होऊन रद्द झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. यामुळे सानुग्रह अनुदानाचा तिढा सोडविण्यासाठी पालिका कामगारांच्या समन्वय समितीने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यानुसार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांबरोबर कामगार संघटनांची बैठक होणार आहे.
यावर्षी महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट व खर्च जास्त झाला आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. मात्र गेले सहा महिने मुंबईकरांसाठी पालिकेचे कोविड योद्धा दिवसरात्र झटत असल्याने अतिरिक्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर आयुक्त इकबाल सिंह चहल यांची गेल्या शनिवारी बैठक होणार होती.
मात्र आतापर्यंत तीनवेळा या बैठका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे सानुग्रह अनुदानाचा तिढा सोडविण्यासठी मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. त्यानुसार बुधवारी वर्षा बंगल्यावर संध्याकाळी बैठक होणार होती. मात्र ही बैठक आता येत्या शुक्रवारी होणार असल्याचे समन्वय समितीचे निमंत्रक ऍड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.
* महापालिकेकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान दिले जाते. यासाठी सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात १५४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
* यावर्षी पालिकेचे वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार अशा सर्वच कर्मचाऱ्यांनी सुट्टी न घेता कोविड काळात काम केले आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने केली आहे.
* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जम्बो फॅसिलिटी सेंटरची उभारणी, औषध खरेदी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, बाधित क्षेत्रात धान्य वाटप आदी कोरोना काळातील कामांसाठी महापालिकेने आतापर्यंत ८०० कोटींहून अधिक रक्कम खर्च केली आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे.