मुंबई : गेला आठवडाभर मुंबईला झोडपून काढल्यानंतर रविवारी पावसाने उसंत घेतली. त्यामुळे पावसाळी पर्यटनाकरिता मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. परंतु मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागला. दरम्यान, रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवार ठाणे ते कल्याण दरम्यान ५-६वा रेल्वे मार्ग आणि हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्ती करण्यात आली.
ठाणे ते कल्याण दरम्यान ५-६व्या रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात आल्याने सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २० ते २५ मिनिटे उशिराने धावल्या. परंतु यामुळे जलद मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते.
- हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला. या दरम्यान वाशी ते पनवेल लोकल सेवा पूर्णपणे बंद होती. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळ दरम्यानची लोकल सेवाही बंद होती. त्याचप्रमाणे वाशी ते सीएसएमटी लोकलची संख्या कमी होती. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत होता.
दुपारी साडेचारनंतर पनवेल ते वाशी दरम्यानची लोकल वाहतूक सुरू झाली. परंतु संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने गाड्यांना मोठी गर्दी झाली होती.