लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०:४० ते दुपारी ३:४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरून सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार असून त्या १० ते १५ मिनिटांच्या उशिराने चालविण्यात येणार आहेत.
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
विशेष लोकल ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - वाशी हार्बर मार्गावर विशेष सेवा असणार असून ठाणे - वाशी/ नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाइन सेवा चालविण्यात येणार आहे.
गोरेगाव व कांदिवलीदरम्यान १० तासांचा ब्लॉकब्लॉक कालावधीत सीएसएमटी मार्गावरून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच पनवेल ठाणे दरम्यानच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील दोन्ही दिशेच्या सेवा बंद राहणार आहेत. तसेच या ब्लॉकमुळे बेलापूर-उरण आणि नेरूळ-उरण बंदर मार्ग सेवा प्रभावित होणार नसल्याचे रेल्वेने सांगितले आहे. गोरेगाव व कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पाचव्या मार्गिकेवर शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ९ पर्यंत १० तासांचा मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहे.