Mega Block : मुंबईत आज तीनही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 09:19 AM2018-07-29T09:19:09+5:302018-07-29T09:29:25+5:30
Mega Block : मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई - मुंबईमध्ये आज तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान अप -स्लो मार्गावर, हार्बर रेल्वेवर वाशी-पनवेल अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भाईंदर ते वसईपर्यंत असेल. यादरम्यान विरार, वसई ते भाईंदर-बोरिवलीपर्यंत सर्व जलद लोकल धीम्या मार्गावर चालतील, तर काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वे
विद्याविहार ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मेगाब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर, सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व जलद, सेमीफास्ट लोकल सकाळी १०.१६ ते दुपारी २.५४ वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, दिवा स्थानकात थांबतील.
कल्याण स्थानकाहून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्धजलद लोकल सकाळी ११.०४ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकातही थांबतील. सीएसएमटीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या सर्व लोकल सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत किमान १० मिनिटे उशिराने धावतील, तर मेल, एक्स्प्रेस गाड्या किमान १५ मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर रेल्वे
पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान सीएसएमटी-वाशी विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. याशिवाय ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे मार्गावर सकाळी १०.१२ ते दुपारी ४.२६ वाजेपर्यंत आणि ठाणे ते पनवेलपर्यंतची लोकल सेवा सकाळी ११.१४ ते दुपारी ४वाजे पर्यंत खंडित राहील.