मुंबई : देखभाल कार्य करण्यासाठी रविवारी हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. ठाणे-वाशी तसेच नेरुळ अप व डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे ठाणे येथून वाशी, नेरुळ व पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन सेवा आणि ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप मार्गाच्या गाड्या रद्द असणार आहेत.
सीएसएमटी-चुनाभट्टी तसेच वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी, वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावरदेखील मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे डाऊन हार्बर मार्गावर सीएसएमटी वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ दरम्यान वाशी, बेलापूर, पनवेलकरिता सुटणाऱ्या आणि सीएसएमटी येथून वांद्रे व गोरेगावकरिता सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.
अप हार्बर मार्गावर पनवेल, बेलापूर व वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या आणि वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीकरिता १०.४५ ते ४.५८ या वेळेत सुटणाऱ्या गाड्या रद्द राहतील. इतर रेल्वेमार्गांवर मेगा ब्लॉक नसल्याने प्रवाशांना या मार्गांवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक
रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा व ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक असणार आहे.
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांच्या दरम्यान सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ या वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गांवर हा मेगा ब्लॉक आहे. मेगा ब्लॉकच्या वेळेत या स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या वेळेत काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.