रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; लोकल 15 मिनिटे उशिराने धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 07:39 AM2019-02-17T07:39:49+5:302019-02-17T07:42:59+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण धिम्या मार्गावर, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते अंधेरी दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर तर, हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.४७ ते ते दुपारी ३.२४पर्यंत मुलुंड ते कल्याणदरम्यान सर्व लोकल जलद मार्गावरून धावतील. ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांत त्यांना अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ वाजेपर्यंत कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर या स्थानकांवर थांबतील. इच्छित स्थानकात पोहोचण्यासाठी त्यांना नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशीर होईल. तर, सीएसएमटी स्थानकातून सकाळी १०.०५ ते दुपारी २.५४ वाजेपर्यंत कल्याण, कसारा, कर्जत दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा येथेही थांबतील.
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात दोन्ही दिशेकडील बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान लोकल धिम्या मार्गावरून धावतील.
हार्बरवर विशेष लोकल
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल आणि पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसएमटी दरम्यान एकही लोकल धावणार नाही. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील.