मध्य रेल्वेवर आज 6 तासांचा मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार मेगाहाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 07:12 AM2018-12-02T07:12:56+5:302018-12-02T07:38:43+5:30
मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. जवळपास सहा तास हा मेगाब्लॉक राहणार आहे.
मुंबई- मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. जवळपास सहा तास हा मेगाब्लॉक राहणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान वडाळा, भायखळ्याच्या पुढे धिम्या मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मस्जिद बंद ते सँड हर्स्ट रोडवर सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे. यादरम्यान मस्जिद बंदरच्या जुन्या पुलाचं पाडकाम करण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनानंही जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे. या कालावधीत मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक भायखळा स्थानकापर्यंत व हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा रोड स्थानकापर्यंतच सुरू राहील. मध्य व हार्बर मार्गावर याशिवाय कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
मस्जिद बंदर येथील पादचारी पूल असुरक्षित झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम मध्य रेल्वे प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज गर्डर टाकण्यासाठी हा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून डाउन धिम्या मार्गावर कल्याणसाठी आज सकाळी १०.१४ वाजता व भायखळा येथून १०.२२ वाजता सुटणारी लोकल शेवटची असेल. याचप्रमाणे, डाउन हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून पनवेलसाठी सकाळी १०.१० वाजता सुटणारी व वडाळा रोड येथून १०.२८ वाजता सुटणारी लोकल शेवटची असेल, तसेच मध्य रेल्वेच्या अप धिम्या मार्गावर सकाळी ९.५० वाजता सुटणारी शेवटची लोकल असेल. याचप्रमाणे, अप हार्बर मार्गावर सकाळी ९.५२ ला शेवटची लोकल सुटेल. त्यानंतर सलग सहा तासांच्या ब्लॉक काळात मध्य रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक भायखळा स्थानकापर्यंत व हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा रोड स्थानकापर्यंतच सुरू राहील.
ब्लॉक कालावधीत सँड हर्स्ट रोड व मस्जिद स्थानकात कोणतीही लोकल थांबणार नाही. भायखळा ते सीएसएमटी दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येईल. यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होणार आहे. मात्र, पूल दुरुस्तीचे महत्त्व लक्षात घेता प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी केले आहे.
प्रवाशांसाठी विशेष फेऱ्या
प्रवाशांच्या सोयीसाठी वडाळा रोड ते पनवेल आणि वडाळा रोड ते वांद्रे-गोरेगाव या मार्गावर पंधरा मिनिटांनी फे-या चालविण्यात येतील.
वसई, विरारदरम्यान चार तासांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या वसई रोड व विरार स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते आज पहाटे साडेचार वाजेपर्यंत ४ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. या कालावधीत डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक डाउन जलद मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. आज दिवसा पश्चिम रेल्वेच्या मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.