मुंबई - राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले असताना, आता राष्ट्रवादीनेही 288 जागांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यासाठी कार्यक्रमा जाहीर केला असून फॉर्मही जारी केले आहेत. या उमेदवारीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जुलै असणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. त्यामुळे राज्यातील वय वर्षे 25 पूर्ण असलेली कुठलिही व्यक्ती या पदासाठी आपला अर्ज सादर करू शकते. विशेष म्हणजे थेट ई-मेलद्वारे प्रदेश कार्यालयाकडे हा अर्ज पाठविण्याची मुभा देण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इच्छुक उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. यापूर्वी काँग्रेसनेही इच्छुक उमेदवारांना 6 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे बजावले आहे. त्यामुळे लवकरच राज्यात राजकीय फिव्हर पाहायला मिळणार असल्याचे दिसून येते. सध्या, फडणवीस सरकारचे शेवटचे अधिवेशन सुरू असून मंत्र्यांसह आमदारमंडळी व्यस्त आहे. मात्र, अधिवेशनाची सांगता होताच, नेतेमंडळी आणि आमदार आप-आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करतील. त्यामुळे इथून पुढील 6 महिने राज्यातील जनता राजकीय चर्चा करताना दिसेल. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही ऑक्टोबर महिन्यात विधानसभांच्या निवडणुका पार पाडतील, असे भाकित केले आहे.