मुंबई : मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यामुळे स्थगित करण्यात आलेली ७२ हजार शासकीय रिक्त पदांवरील मेगा भरती सुरू करण्यात येत असून, फेब्रुवारी, २०१९ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी ‘लोकमत’ला दिली.राज्य सरकारच्या अखत्यारीतील रिक्त पदांपैकी ७२ हजार जागांची मेगाभरती करण्याचा निर्णय सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र, मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत ही भरती करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. त्यामुळे सरकारने भरत स्थगित केली होती.आता मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय नोकरीत १६ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद असलेला कायदा लागू झाल्याने, भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येत आहे.या संदर्भात मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सचिव गटाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. ही सगळी पदे फेब्रुवारी, २०१९ पर्यंत भरून त्यांना नेमणूकपत्र देण्यात येतील, असे कुंटे यांनी सांगितले.>या ७२ हजार पदांपैकी जवळपास ८० टक्के पदे जिल्हास्तरावरील आहेत. सध्या बिंदू नामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य व वन विभागात ही भरती होणार आहे.- डी. के. जैन, मुख्य सचिव
राज्यात मेगा भरती; ७२ हजार पदे भरणार, मराठा आरक्षण मार्गी लागल्याने सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 6:24 AM