आचारसंहितेपूर्वी शिक्षकांची मेगाभरती  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 06:10 AM2019-02-09T06:10:57+5:302019-02-09T06:12:00+5:30

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या मेगाभरतीची जाहिरात लवकरच काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या भरतीचा मार्ग मोकळा झालेला असेल.

Mega recruitment of teachers before the Code of Conduct | आचारसंहितेपूर्वी शिक्षकांची मेगाभरती  

आचारसंहितेपूर्वी शिक्षकांची मेगाभरती  

Next

मुंबई  -  राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या मेगाभरतीची जाहिरात लवकरच काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या भरतीचा मार्ग मोकळा झालेला असेल.
प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांची ही भरती असेल. नेमकी किती पदे भरण्यात येणार या बाबत वेगवेगळे दावे केले जात असले तरी प्रत्येक ठिकाणच्या रोस्टरनुसार पदांची गरज लक्षात घेऊन भरती केली जाईल मात्र, ही पदे काही हजारांच्या घरात असतील, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पहिली ते आठवीच्या शिक्षकांना डीएड, बीएडसह शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य असेल. नववी ते दहावीच्या शिक्षकांसाठी संबंधित विषयातील पदवी ५० टक्क्यांसह उत्तीर्ण आणि शिक्षणशास्र पदवी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल. अकरावी, बारावीसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी ५० टक्क्यांसह उत्तीर्ण आणि शिक्षणशास्र पदवी अनिवार्य असेल. नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्णतेची अट नसेल.
या भरतीवरून टीका होत असताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारे करण्याची प्रक्रिया सुरू करूनही ज्यांना मात्र कावीळ झाली आहे, त्यांना सर्व पिवळे दिसत आहे, अशी टीका केली.
आचारसंहितेपूर्वी भ्रष्टाचारविरहित आणि गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल. एका जागेसाठी जर संस्था चालकांना जागा भरावयाची असेल तर पवित्र पोर्टलवर गुणवत्तेवर असलेली पहिली १० नावे संस्था चालकांना पाठविण्यात येतील व त्यामधून गुणवत्तेच्या आधारे १० उमेदवारांची निवड गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्यात येईल. यामध्ये उमेदवारांची मुलाखत आणि वर्गात शिकविण्याचे तास घेऊन, याचे गुणांकन कसे करायचे याचे निर्देश दिले आहेत. मुलाखत व वर्गात घेतलेल्या तासाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. या मुलाखती मधून उमेदवारास नाकारल्यास, त्याची लेखी माहिती द्यायला सांगितले आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Mega recruitment of teachers before the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.