‘भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती’, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 05:23 AM2019-08-19T05:23:50+5:302019-08-19T05:27:25+5:30
अनेक आमदारांना पक्षात यायचे आहे. पण कोणाला घ्यायचे, कोणाला नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत.
मुंबई : विरोधी पक्षातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असून कोकणातील पाच ते सहा आमदार भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचा दावा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. अनेक आमदारांना पक्षात यायचे आहे. पण कोणाला घ्यायचे, कोणाला नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. लवकरच आणखी मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल, असेही लाड म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्रातील काही नेते सध्या पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यातच प्रसाद लाड यांनी कोकणातीलही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे विधान केल्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणातही आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेना व भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री पदाबाबत परस्पर विधाने केली जात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेली युती विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आल्यावर तुटेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लाड यांनी मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती कायमच राहणार असल्याचा दावाही केला.