मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षात येण्यासाठी नेत्यांची अक्षरश: रीघ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले शनिवारी नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वत: आज ही घोषणा केली. रात्री ते मुख्यमंत्र्यांसह नवी दिल्लीत दाखलही झाले. राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार व माजी राज्यमंत्री भास्कर जाधव व एन्काउन्टर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त असतानाच त्यांनी फलटणमध्ये समर्थकांचा मेळावा घेऊन शरद पवार यांना दुखावले, तर माझा शेवट चांगला होणार नाही, अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे शिवसेना प्रवेशाबाबत त्यांचे अजूनही तळ्यात -मळ्यात असल्याचे स्पष्ट झाले.
भास्कर जाधव हे शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत चार्टर्ड विमानाने औरंगाबादला गेले आणि त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपविला. तेथून मुंबईत परतून मातोश्रीवर पोहोचत त्यांनी शिवबंधन बांधले. ‘स्वगृही परतल्याचा आपल्याला आनंद आहे. मी मूळचा शिवसैनिकच आहे,’ अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.
प्रदीप शर्मा हे नालासोपारा येथे शिवसेनेचे उमेदवार असतील, हे त्यांच्या प्रवेशाच्या वेळी स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. आ. हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला असलेला हा भाग आहे. ठाकूर यांच्या वर्चस्वाला धक्का देणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे पत्रकारांना म्हणाले की, मी कुणाला हरविण्यासाठी नाही, तर स्वत: जिंकण्यासाठी लढत असतो. प्रदीप शर्मा कोणाचे एन्काउन्टर करणार हे निवडणुकीत दिसेलच.निवडणुकीबाबत मनसेचे फिफ्टी-फिफ्टीमुंबई : आगामी विधानसभा निवडणूक मनसेने लढावी की लढू नये, याबाबत पक्षाचे नेते आणि सरचिटणिसांची बैठक राज ठाकरे यांनी शुक्रवारी बोलविली. त्यात ‘फिफ्टी-फिफ्टी’चा कौल मिळाला. त्यामुळे अंतिम निर्णय राज घेणार आहेत. मुंबई, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक लढण्याबाबत एकवाक्यता नव्हती. पुणे, नाशिकमधील नेत्यांनी निवडणूक लढलीच पाहिजे, असा आग्रह धरला. लोकसभा निवडणूक लढली नव्हती. आता विधानसभेची निवडणूकही लढली नाही, तर चांगला संदेश जाणार नाही, असेही त्यांचे म्हणणे होते. काही नेत्यांनी मात्र, ‘ईव्हीएम’वर निवडणूक होणार असेल तर लढू नये, अशी भूमिका पक्षाने घ्यावी, असे मत बैठकीत मांडले.